Join us  

"आता संजय राऊत म्हणतील, काय ती ईडी, काय चौकशी अन् काय ते जेल; सर्व ओके आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 1:25 PM

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीच्या चौकशीवरुन टोला लगावला आहे.

मुंबई- ईडीने सोमवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी चौकशीसाठी समन्स जारी केले. आज त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल होण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव मी आज ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात असणारे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल... ओक्के मदी सगळं, असं बोलताना दिसत आहे. 

 '...तर एकनाथ शिंदेंही उद्धव ठाकरेंना भेटण्यास तयार'; दीपक केसरकरांचं मोठं विधान

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याचाच संदर्भ घेत संजय राऊत यांना टोला लगावला आहे. 'आता संजय राऊत म्हणतील, काय ती ईडी, काय चौकशी अन् काय ते जेल, सर्व ओके आहे' असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. 

दरम्यान, मला ईडीने समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या मला अटक करा, असं संजय राऊत म्हणाले. तसेच हा तपास यंत्रणांचा गैरवापरच आहे. मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, तरीही नोटीस दिली जाते आहे. याबाबत कोण सूचना देत आहे, याची मला कल्पना आहे. या लोकांना विरोधकच संपवायचे आहेत. जे काही चाललंय ते चुकीचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतसंदीप देशपांडेमनसेशिवसेनाअंमलबजावणी संचालनालय