Join us  

'...अन्यथा जनता ठाकरे सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही'; मनसेचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 1:38 PM

राज्यात वाढणाऱ्या डेल्टा प्लस या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटपासून सावधान होत निर्बंध कठोर करण्यात आले होते.

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहाता टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस यांचा राज्यातील निर्बंधाला विरोध आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अप्रत्यक्ष बोलूनही दाखवलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळात राज्यातील निर्बंध शिथील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात वाढणाऱ्या डेल्टा प्लस या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटपासून सावधान होत निर्बंध कठोर करण्यात आले होते. दोन आठवड्यातील परिस्थिती पाहाता राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्या आणि मृताची आकडेवारीही घटताना दिसत आहे. मात्र अजूनही सरकारने निर्बंध न हटवल्याने मनसेने निशाणा साधला आहे.

सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, त्यांना गृहीत धरू नये. रुग्णसंख्या कमी झाली आहे. निर्बंध का उठवत नाही? ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झाले तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. 

सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसेच आम्ही लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यंना पत्र दिले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना फक्त घरातच बसून राहायचंय. जनता सरकारवर नाराज आहेत, हे वसुली सरकार फक्त हफ्तेखेरी करतंय, असा आरोपही संदीप देशपांडे यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकारने २३ जिल्हे तिसऱ्या टप्प्यात गणले. सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत दुकानांना परवानगी दिली असून शनिवार, रविवारी अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निघाले. या आदेशाने पुन्हा लहान-मोठ्या व्यावसायिकांसमोरील अडचणी वाढल्या तर राज्याची आर्थिक स्थितीसुद्धा बिकट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता १५ जुलैनंतर राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून निर्बंध शिथिलतेचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

टॅग्स :संदीप देशपांडेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारमनसे