Join us  

शरद पवारांच्या पार्टीला मुख्यमंत्र्यांसह अदानी- अंबानीही उपस्थित; मनसेचा फोटो शेअर करत निशाणा

By मुकेश चव्हाण | Published: December 24, 2020 2:41 PM

कोरोना तिथे फिरकला सुद्धा नाही. मात्र सामान्य जनतेच्या पार्ट्यांमध्ये तो हमखास येतो, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या नाईट कर्फ्यूदरम्यान 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. रात्री 11 पर्यंत कोणताही नियम बदललेला नाही. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध असणार आहे, असं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी जाहीर केले आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या या निर्णयानंतर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं नेमकं कारण काय आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालतं. मग लोकांना बंधन का, असा सवाल उपस्थित करत कोण कुठे पार्ट्या करतं, हे सर्वांना माहीत आहे, अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 

संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस महालक्ष्मी रेसकोर्स येथे नुकताच साजरा झाला. त्या पार्टीला अदानी-अंबानी यांच्यासह मुख्यमंत्रीसुद्धा सहकुटुंब उपस्थित होते. कोरोना तिथे फिरकला सुद्धा नाही. मात्र सामान्य जनतेच्या पार्ट्यांमध्ये तो हमखास येतो. मुंबईकर नव्हे, पण हा कोरोना खूप डॅम्बिस आहे, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. 

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात 22 डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. 

अन्य राज्यांतील प्रवाशांची रवानगी

ब्रिटनमधून येणारे 236 प्रवासी महाराष्ट्राबाहेरील असल्याने त्यांनी आपल्या राज्यात पाठविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येईल. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना कळविण्यात आले आहे, असे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

टॅग्स :मनसेशरद पवारउद्धव ठाकरेसंदीप देशपांडेराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस