Join us

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 19:22 IST

MNS Leaders Reaction Over Raj Thackeray And Uddhav Thackeray Yuti: २०१९ मध्ये अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असते, तर आज त्यांच्यालेखी भाजपा महाराष्ट्रद्रोही असता का? असा थेट प्रश्न मनसे नेत्यांनी केला आहे.

MNS Leaders Reaction Over Raj Thackeray And Uddhav Thackeray Yuti: २०१९ पर्यंत यांच्यासाठी भाजपा चांगला होता. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकाही एकत्रच लढले होते. आता मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांच्यात काय बोलणे झाले मला माहिती नाही. पण २०१९ नंतर त्यांचे फिस्कटले, त्यानंतर भाजपा हा महाराष्ट्रद्रोही झाला. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. भाजपाची भूमिका काय, हे २०१९ च्या आधी माहिती नव्हती का? एका भाषणात उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, भाजपासोबतच्या युतीत २५ वर्ष आम्ही सडलो. मात्र, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेत भाजपासोबत युती केली. ज्या पक्षाशी युती केली, ती तोडून उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेसच्या नादी उद्धव ठाकरे लागले. महाविकास आघाडी केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. जर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना मिळाले असते, तर आज त्यांच्यालेखी भाजपा महाराष्ट्रद्रोही असता का? असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

आगामी मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी ठाकरे गटाशी युतीबाबत आपले मत व्यक्त केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही काही अटी घालत साद घातली. यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना चांगलेच बळ मिळाले. यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत ठाकरे गटावर टीका केली आहे.

श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांनी आमचे फोन उचलणे बंद केले

२०१७ मध्ये श्रीधर पाटणकर मला भेटले. मला म्हणाले की, दोन्ही भावांना आपण एकत्र आणले पाहिजे. दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हिताच्या गोष्टी झाल्या पाहिजेत, असा त्यांनी प्रस्ताव ठेवला. यानंतर राज ठाकरे यांच्याशी मी चर्चा केली. श्रीधर पाटणकरांना आम्ही सांगितले की, यावर चर्चा होऊ शकते. युती करायची की नाही, हे आपण ठरवू. त्याप्रमाणे आमची भेट झाली. आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले. त्यावेळेस उद्धव ठाकरे त्यांना म्हणाले की, आत्ता आमचे भाजपासोबत लग्न आहे. आमचे लग्न मोडल्यानंतर आपण आपला साखरपुडा करू. त्यानंतर कोण किती जागा लढणार, काय जागा लढणार, हा सगळा विषय होता. त्याप्रमाणे त्यांनी २६ जानेवारी रोजी भाजपासोबत युती तोडली. त्यानंतर श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांनी आमचे फोन उचलणे बंद केले, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 

उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांनी फोन उचलले नाही

भारतीय जनता पार्टी आणि शिवसनेनेची युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क केला, दोघे बोलले आणि एकत्र लढायचे ठरले. यावर आमच्याकडून बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून अनिल देसाई चर्चा करतील असे ठरले होते. त्याच्यासाठी राज ठाकरे यांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. हे ठरल्यानंतर दोन दिवस उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांनी फोन उचलले नाही. अनिल देसाईंनी त्यांचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली तरीही मनसेने एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. हे सांगायचा उद्देश असा की, आम्हाला शिवसेनेने २०१४ आणि २०१७ (मुंबई महापालिका निवडणूक) असा दोन वेळा धोका दिला, याची संदीप देशपांडे यांनी आठवण करून दिली.

दरम्यान, मनसे नेते अमेय खोपकर यांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. अशी अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.

 

 

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाशिवसेनाउद्धव ठाकरे