Join us  

'हलवा आहे का?, ब्रमिष्ठ झाल्यासारखे दोन दिवस बरळताय'; नांदगावकर बोम्मईंवर संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 2:15 PM

बसवराज बोम्माईंच्या या विधानामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील या विधानाचा निषेध केला.

मुंबई- महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे. बसवराज बोम्मई यांच्या या विधानामुळे आता महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. यातच आज पुन्हा बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

कर्नाटकची एक इंच भूमी कोणाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर हे कर्नाटकात विलीन करावेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं. परंतु त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं बसवराज बोम्माई यांनी म्हटलं आहे. 

'सोलापूर अन् अक्कलकोट कर्नाटकात विलीन करा'; बसवराज बोम्माईंचा नवा दावा

बसवराज बोम्माईंच्या या विधानामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील या विधानाचा निषेध केला. "हलवा"आहे का?भ्रमिष्ट झाल्यासारखे कर्नाटक चे मुख्यमंत्री दोन दिवस झाले बरळत आहेत. शिर्डीला सगळ्यात जास्त भाविक आंध्रचे येतात, तर त्यांनी शिर्डी वर अधिकार सांगावा का? आधी जत तालुक्यातील गावे व आज अक्कलकोट आणि सोलापूर बद्दल बेताल वक्तव्य करून उगाच लोकांच्या भावना प्रक्षोभित करत आहेत, असं बाळा नांदगावकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच केंद्राने यांना कडक समज द्यावी व यांची बेताल वक्तव्ये थांबवावी. बालिशपणा थांबवून आपल्या पदाला शोभेल असे वागा, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

दरम्यान, जतमधील गावांचा ठराव हा २०१२ मधील होता. आता कोणताही नवीन ठराव केलेला नाही. हे शत्रुत्व नाही, कायदेशीर लढाई आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच एकही गाव महाराष्ट्रातून कुठेही जाणार नाही. उलट सीमाभागातील गावं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२०१२ ला कर्नाटकात जत तालुक्यात ही गाव यावीत ही मागणी होती. जत तालुक्यातील पाण्यासाठी राज्य सरकारचे काम सुरू आहे. सामोपचाराने हा विषय सोडवला पाहिजे, यासाठी आम्ही बैठका घेतल्या आहेत. जत तालुक्यातील लोकांसाठी आम्ही योजनेत सुधारणा केल्या आहेत. महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वीच सीमाभागातील प्रश्नाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांची कोल्हापूरमध्ये बैठक झाली होती. तसेच सीमाप्रश्नाबाबत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची समन्वय समितीही राज्य सरकारकडून तयार करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नाबाबत सकारात्मक पावले उचलली जात असताना कर्नाटक सरकारने मात्र ४० गावांचा विषय उकरून काढत खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता राज्य सरकार कर्नाटकला काय प्रत्युत्तर देते याची प्रतीक्षा आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बाळा नांदगावकरमनसेराज ठाकरेकर्नाटकमहाराष्ट्र