Amit Raj Thackeray Meets BJP Minister Ashish Shelar: गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आता राजपुत्र अमित ठाकरे यांनी भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
मिळालेल्या माहिनुसार, अमित ठाकरे यांनी सकाळी ९.३० च्या सुमारास वांद्रे येथील कार्यालयात आशिष शेलार यांची भेट घेतली. गणेश उत्सव कालावधीत शाळा व महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक तात्पुरते रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली. अमित ठाकरे यांनी याबाबतचे एक निवेदन आशिष शेलार यांना दिले आहे. २६ तारखेला परीक्षा आहेत. माझे म्हणणे आहे की, परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या पाहिजेत. २७ तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महाराष्ट्राचा उत्सव आहे. अनेकाना गावी जायचे असते. परंतु, परीक्षेचा ताणही कायम राहतो. यामुळे परिपत्रक सांस्कृतिक मंत्र्यांकडे जावे, असे मला वाटले, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे.
आशिष शेलार यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही
आशिष शेलार यांच्या भेटीदरम्यान आमची जी चर्चा झाली त्यात राजकीय काही झाले नाही. टीका राजकीय होतात, वैयक्तिक होत नाही. त्यामुळे वैयक्तिक दुरावा नाही, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईतील खड्ड्यांबाबत अमित ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, खड्ड्यांबाबत अनेक वर्षे बोलले जाते. याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे. एकदा संधी द्या. नाशिकमध्ये तुम्ही पाहिले आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह, समाजासह या सणाचा आनंद लुटणे ही त्यांची संस्कृतीशी असलेली नाळ जपण्याची जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही आमची ठाम अपेक्षा आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आशिष शेलार यांना गणपतीचे आमंत्रण दिले आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. यावर, उद्धव ठाकरे यांना गणपतीचे निमंत्रण दिले का, असे विचारले असता, ते सरप्राईज असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.