Join us  

महाविकास आघाडीबाबत मनसेकडून पहिल्यांदाच भाष्य; आगामी निवडणुकीबाबत ठरली रणनीती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 1:23 PM

लवकरच मनसेचं महाधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बैठकीत आढावा महाविकास आघाडीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे मांडणार अधिकृत भूमिका जे काही राज्यात झालं ते लोकांना न पटणारं, बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षात मनसेकडून काही हालचाल सुरु नव्हती. मात्र राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. सर्वाधिक जागा जिंकून भाजपा विरोधी बाकांवर बसले आहे. त्यामुळे एकंदर राज्यातील राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

याबाबत मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक राजगडावर पार पडली. त्यात बाळा नांदगावकर, जयप्रकाश बाविस्कर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी होणाऱ्या धुळे, औरंगाबाद, बदलापूर, कल्याण-डोंबिवली अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेची रणनीती काय असावी यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीबाबत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, महाविकास आघाडीबाबत आम्ही तटस्थ भूमिकेतून पाहत आहोत. विचारधारा सोडून दुसरीकडे वळतोय हे लोकांना न पटणारं आहे. जे काही झालं ते लोकांना फारसं पटणारं नाही, जो काही निर्णय असेल राज ठाकरे लवकरच घेतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा घेतला पुढे काय करायचं याची रणनीती ठरविण्यासाठी बैठक झाली अशी माहिती त्यांनी दिली. 

तसेच लवकरच मनसेचं महाधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे समस्या अनेक प्रश्न आहेत. हे अधिवेशन कुठे घ्यायचं याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील. महाविकास आघाडीबाबत लोकांमध्ये काय मतं आहेत? पुढे काय करायचं? लोकांनी मनसेला अनेक ठिकाणी भरभरुन मतदान केले आहे. त्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणूनच पुढील निर्णय घेणार आहोत असं विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. 

यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केलं होतं. मात्र युती आणि आघाडीच्या तुलनेत स्बबळावर लढणाऱ्या मनसेला राज्यात केवळ १ जागा जिंकता आली. मनसेने या निवडणुकीत १०० च्या आसपास उमेदवार उभे केले होते. त्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले. मनसेचा एकमेव आमदार राज्यात निवडून आला असला तरी मुंबई, ठाणे पट्ट्यात काही जागांवर मनसेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत 

टॅग्स :मनसेराज ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसबाळा नांदगावकर