फेसबुक लाईव्हनंतर मनसेचं ठरलं; मराठी कामगार सेनेबद्दल मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 04:56 PM2024-01-09T16:56:10+5:302024-01-09T16:57:45+5:30

मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मराठी कामगार सेनेबद्दल घेण्यात आलेला निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

MNS decided after Facebook Live; Big decision about Marathi Kamgar Sena | फेसबुक लाईव्हनंतर मनसेचं ठरलं; मराठी कामगार सेनेबद्दल मोठा निर्णय

फेसबुक लाईव्हनंतर मनसेचं ठरलं; मराठी कामगार सेनेबद्दल मोठा निर्णय

मुंबई - मनसे पदाधिकारी आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले. जाधव यांच्या या आरोपानंतर मनसेने सविस्तर खुलासाही केला. महेश जाधव यांच्याबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे सातत्याने येत होत्या. कामगारांची फसवणूक करून जाधव त्यांच्यावर अरेरावी करायचे, त्यामुळे त्या वादातून कामगारांनीच जाधव यांना मारहाण केल्याचं मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी सांगितले आहे. त्यानंतर, आता मनसेनं मराठी कामगार सेनेबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मराठी कामगार सेनेबद्दल घेण्यात आलेला निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ''सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळविण्यात येत आहे की, राज ठाकरेंच्या आदेशानुसार 'मराठी कामगार सेना' ह्या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे'', असे मनसेनं म्हटलं आहे. तसेच, 

सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळविण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार 'मराठी कामगार सेना' ह्या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. 'मराठी कामगार सेना' ह्या संघटनेचा, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'शी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना 'महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने'शी कोणताही संबंध नसेल, असे मनसेनं पत्रक काढून स्पष्ट केले आहे. तसेच, 'मराठी कामगार सेने'च्या कोणत्याही भूमिकांशी, 'मराठी कामगार सेने'च्या पदाधिकारी सदस्यांशी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' या राजकीय पक्षाचा, पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल ह्याची सर्व महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही मनसेकडून करण्यात आलं आहे.  

मारहाणीवरही दिलं स्पष्टीकरण

मनसे आणि मराठी कामगार सेनेतील वादाच्या घटनेवर मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून महेश जाधव यांच्याविरोधात कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे येत होत्या. त्याबाबत चार पाच वेळा पक्षाने त्यांना बोलावलेही होते. जाहीर सक्त ताकीद दिली होती. कामगारांच्या हितासाठी तुमचे धोरण बदला. कामगारांचे नुकसान करू नका असं सांगितले होते. आज ते कामगार न्याय मागायला राजगडवर आले होते. तेव्हा यापुढे ही युनिट तुम्ही पाहायची नाही. पक्षाकडून दुसरा व्यक्ती युनिटवर नेमली जाईल असं पक्षाने सांगितले. तरीही तो कामगारांसोबत वाद घालू लागला. त्यात ज्या कामगारांना महेश जाधव यांनी फसवलं त्यांनीच जाधव यांना मारहाण केली असं त्यांनी स्पष्ट सांगितले. 

महेश जाधव खंडणीखोर

महेश जाधव यांच्याबद्दल अनेक खंडणीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. कामोठे पोलीस ठाण्यात महेश जाधवबद्दल अनेक तक्रारी आहेत. एका मुलीचं अपहरण करून तिला ३ दिवस डांबून ठेवले होते, हेदेखील कामोठे पोलीस ठाण्यात नोंद आहे. सातत्याने महेश जाधव यांच्याविरोधात अशा तक्रारी येत होत्या. त्यामुळे पक्षाने जाधव यांच्यावर कारवाई करण्याचं ठरवलं होते. मात्र, त्याआधीच कामगारांच्या वादातून महेश जाधव यांनी मार खाल्ला.कामोठे परिसरातील विविध बिल्डरकडे चौकशी केली तर तेथील बिल्डरही हे खंडणीखोर कोण आहेत असं सांगतील. महेश जाधव यांच्या आरोपांनी आमची अब्रु जात नाही. लोकशाही आहे, त्यांना जे काही बोलायचे असेल ते बोलतील असा पलटवारही मनसेच्या योगेश चिल्ले यांनी महेश जाधव यांच्यावर केला. 

काय आहे प्रकरण?

महेश जाधव हे मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नुकतेच फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले. अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी मला बेदम मारलं. कसाबसा जीव वाचवून माथाडी कामगारांनी मला तिकडून पळवून आणले. या लोकांनी मला वाचवलं. राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारलं आहे. हे नेमकं काय आहे? मागील २० वर्ष मी राज ठाकरेंसोबत घालवली. ते दाखवतात एक आणि करतात एक. राज ठाकरेंचा पक्ष फक्त खंडणीखोर आहे असं त्यांनी म्हटलं. 
 

Web Title: MNS decided after Facebook Live; Big decision about Marathi Kamgar Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.