मनसेची संस्कृती गुंडगिरीची - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 19:15 IST2017-12-01T18:28:33+5:302017-12-01T19:15:12+5:30
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मनसेची संस्कृती गुंडगिरीची - अशोक चव्हाण
मुंबई - मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
याविषयी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, मनसेची संस्कृती गुंडगिरीची आहे. लोकशाहीत कायदे व नियमांचे पालन करीत परस्परांच्या मतांचा आदर केला पाहिजे, परंतु मनसेचे कार्यकर्ते ज्या पध्दतीने कायदा हातात घेऊन मुंबईत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत ते निषेधार्ह आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी तोडफोड करून अनेक लोकांना मारहाण केली. काँग्रेस पक्षाने मनसेच्या या दादागिरीचा विरोध केला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी त्याच्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पाठीशी घातल्याने त्यांचे मनोबल वाढले असून राजकीय विरोधकांच्या कार्यालयावर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
राजकारणात वैचारिक मतभेद असतात पण त्यांचा मुकाबला विचाराने करायचा असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय विरोधासाठी हिंसेचा वापर करित आहे हे चुकीचे आहे. सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसे कार्यकर्ते मुंबई शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करित आहेत. हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करुन कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.