Join us

राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 05:51 IST

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवत विजयोत्सव साजरा करण्यासाठी वरळी येथे एकत्र येऊन गळाभेट घेतलेल्या ठाकरे बंधूंनी रविवारी पुन्हा एकदा गळाभेट घेतली. यावेळी निमित्त ठरले ते उद्धवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे. उद्धव यांना ६५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी थेट मातोश्रीवर पोहोचले. अनेक वर्षानंतर राज मातोश्रीवर आल्याने उद्धव यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला.

मातोश्रीबाहेर उभारण्यात आलेल्या मंडपात आधी राज यांनी उद्धव यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राज यांनी लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ भेट देत मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या. दोघांनी एकत्रपणे समोर उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. राज यांच्याबरोबर यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई होते, तर उद्धव सेनेचे नेते संजय राऊत, अंबादास दानवे हेही उपस्थित होते.

राज बाळासाहेबांच्या आसनापुढे नतमस्तक

शुभेच्छा दिल्यानंतर राज हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य असलेल्या खोलीत गेले. बाळासाहेबांच्या आसनापुढे नतमस्तक झाले. दोन्ही भावांत यावेळी २० मिनिटे चर्चा झाली. ठाकरे बंधूंची ही वाढती जवळीक दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी ठरली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते एकत्र येणार काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राज यांची भावासाठी पोस्ट

उद्धव यांना शुभेच्छा दिल्यानंतर राज यांनी 'एक्स'वर भेटीचा फोटो शेअर केला. 'माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या,' असे पोस्टमध्ये म्हटले.

आनंद शतगुणीत झाला : उद्धव ठाकरे

राज यांच्या भेटीने व शुभेच्छांनी आनंद शतगुणीत झाला आहे. यापुढील काळही आनंदाचा आणि चांगलाच असेल. अनेक वर्षांनी आम्ही भाऊ भेटलो. आम्ही जेथे वाढलो, तेथे आम्ही भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवले त्यांच्या खोलीत जात आम्ही नतमस्तक झालो, असे यावेळी उद्धव म्हणाले.

मातोश्रीवर याआधी कधी? : काही वर्षांपूर्वी उद्धव यांना हृदयासंबंधीचा त्रास जाणवल्यामुळे राज यांनी त्यांचा दौरा अर्धवट सोडत लीलावती रुग्णालय गाठले होते. त्यावेळी स्वतः गाडीचे सारथ्य करत राज यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीपर्यंत आणले होते. हा अपवाद वगळता शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर कधीच गेले नव्हते.

दीड महिन्यांनंतर पुन्हा भेटीचा योग : हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी वरळी येथे ५ जून रोजी मेळाव्यात उद्धव व राज दोन दशकांनंतर एकत्र आले होते. त्याला दीड महिन्याहून जास्त काळ लोटल्यानंतर हा योग आला.

यात राजकारण आणायचे काही कारण नाही : उद्धव यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले ही आनंदाची गोष्ट आहे. राज ठाकरे हे शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांना आमच्याही शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणे यात राजकारण आणायचे काही कारण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनामनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाबाळासाहेब ठाकरे