२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:34 IST2025-12-03T19:33:12+5:302025-12-03T19:34:24+5:30
Raj Thackeray Meet Sanjay Raut: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घरी जाऊन संजय राऊतांची भेट घेतली.

२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
Raj Thackeray Meet Sanjay Raut: उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीत काही गंभीर समस्या असल्याचे समोर आले. बाहेर जाण्यास व गर्दीत मिसळण्यापासून काही दिवस दूर राहण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे, अशी माहिती स्वतः राऊत यांनी सोशल मीडियावरून दिली होती. यानंतर अलीकडेच संजय राऊत पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. हल्ली रोज संजय राऊत यांना फोन करत नाही. आता रोज सुनील राऊतला संजयच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी छळत असतो. खूप दिवसांपासून त्यांना भेटायचे होते. आता भेट झाली, चांगले वाटले. संजय खूप फ्रेश दिसले. संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील. नुसते दिसणार नाहीत तर तलवार घेऊन मैदानात दिसतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. हा विश्वास सार्थ ठरवत अलीकडेच संजय राऊत नेहमीच्या फॉर्ममध्ये सक्रीय झालेले दिसले. यानंतर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
२० वर्षांनी राज ठाकरे गेले संजय राऊतांच्या घरी
राज ठाकरे यांनी घरी जाऊन संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. याबाबत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. संजय राऊत आजारी हे सर्वांना माहिती आहेत. राज ठाकरे सतत माझ्या संपर्कात होते. संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. संजय राऊतांना यूएसला नेले पाहिजे की, अन्य काही केले पाहिजे, याबाबत राज ठाकरे माझ्याशी बोलत होते. राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर आमच्या घरी आले. आम्ही खूप आनंदी आहोत. तुझा ज्या प्रकारचा आजार आहे, त्यानुसार तुला राहावे लागेल. लोकांमध्ये न जाता दीड-दोन महिने आराम करावा, असा सल्ला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिला आहे, अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली.
दरम्यान, आजारपणामुळे गेले काही दिवस सक्तीच्या विश्रांतीवर असलेले ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत पुन्हा मैदानात उतरले आहेत. याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी संजय राऊत यांनी शिवाजी पार्क येथे उपस्थित राहत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली होती. थकलेले शरीर आणि तोंडावर मास्क लावलेले संजय राऊत भाऊ सुनील राऊत यांचा हात हातात घेत शिवाजी पार्कवर आले. संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक झाले. आजारपणाचा सामना करत असतानाही संजय राऊत हे लढाऊ बाणा दाखवत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी आल्याने उपस्थित शिवसैनिकही भारावून गेलेले दिसले.