चटके-फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाहीः राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 13:06 IST2018-10-15T13:02:35+5:302018-10-15T13:06:37+5:30
गुजराती माणूस हुशार असतो हे आता कळून चुकलंय. पण, मराठी माणूस मागे आहे हा भ्रम काढून टाका, असा सल्ला राज ठाकरे यांनी तरुणांना दिला.

चटके-फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाहीः राज ठाकरे
मुंबईः 'आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर', असं अनेक वर्षांपूर्वी एका न शिकलेल्या कवयित्रीने - बहिणाबाई चौधरींनी सांगून ठेवलंय. खरोखरच, चटके-फटके खाल्ल्याशिवाय पुढे जाता येत नाही; मग तो उद्योग असो किंवा राजकारण... स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि हिंमत असेल तर तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता, असा मंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तरुणांना दिला.
गुजराती माणूस हुशार असतो हे आता आपल्याला कळतंच आहे, असा टोमणा मारतानाच, मराठी माणूस मागे आहे हा भ्रम काढून टाका, आपल्या राज्यात काय दडलंय हे ओळखा आणि पुस्तकं वाचून धंदा करण्याच्या फंदात पडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. 'मी उद्योजक होणार', या कार्यक्रमात राज यांनी उदयोन्मुख उद्योजकांना मार्गदर्शन केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशीही उपस्थित होते.
महाराष्ट्रातलं वातावरण हे उद्योगधंद्यांसाठी पोषक आहे. इतर राज्यांतून घर-दार सोडून अनेक जण इथे उद्योग-व्यवसाय करण्यासाठी येतात, कारण इथल्या मातीतच तो गुण आहे. मात्र, आपण दोन-चार गोष्टींकडे पाहून सारांश काढतो आणि सरसकट सगळेच गुजराती धंदा करतात आणि यशस्वीच होतात, असा भ्रम करून घेतो. त्यामुळे जरा बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन बघा, ते कशा पद्धतीने जगताहेत - काय करताहेत हे पाहा. ते पाहिल्यावर आपण अत्यंत चांगल्या राज्यात जन्माला आलोय, याची जाणीव तुम्हाला होईल, असं मार्गदर्शन राज ठाकरे यांनी केलं. आपला मराठी माणूस वडा-पाव विकतो, म्हणून आपलेच लोक हिणवतात. पण तोही धंदाच आहे. त्यातूनही तो चांगले पैसे कमावतोय. घाबरून घाबरून कुठलीच गोष्ट करता येत नाही, गडावर चढायचं तर दोर छाटावाच लागतो, असं बळही त्यांनी दिलं.
मोठी स्वप्नं पाहा आणि ती साकार करण्यासाठी मेहनत करा, हे वाक्य गुळगुळीत झालं असलं तरी तेच सत्य आहे, असं राज ठाकरे म्हणाले. उद्योगक्षेत्रात यशस्वी झालात की येऊन भेटा, निवडणुकीसाठी फंड मागणार नाही, हवं तर निवडणूक झाली की या, असं आग्रहाचं आमंत्रणही त्यांनी दिलं.