Join us
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा माज आल्याने महाजनांकडून सेल्फी घेण्याचा प्रकार; राज ठाकरेंची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:38 IST

पूरग्रस्त भागात जाऊन भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनी सेल्फी व्हिडीओ काढला यावरुन अनेक स्तरातून सरकारवर टीका होत आहे.

मुंबई -  आज पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. गिरीश महाजन तर सेल्फी घेत होते. आणि हे असं सगळं करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की ते निवडून येणारच आहेत. हा एक प्रकारचा माज आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गिरीश महाजनांवर केली आहे. 

पूरग्रस्त भागात जाऊन भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनी सेल्फी व्हिडीओ काढला यावरुन अनेक स्तरातून सरकारवर टीका होत आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेल्या गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा अविर्वावात फिरताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांच्योसोबत काही कार्यकर्ते आणि पोलीसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे. 

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती पाहून अवघा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. त्यातच, सांगलीतील बोट दुर्घटनेत जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांचे स्थलांतर झाले आहे. पूरग्रस्त लोकांना राज्यभरातून मदत पुरविण्यात येत असून अन्न आणि निवाऱ्याची सोय करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देत, पूरस्थितीची हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बचत आणि मदतकार्य जोमाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते. मात्र, या पाहणी दौऱ्यात गिरीश महाजन यांनी बोट सफर केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तर विरोधी पक्षाकडूनही गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! 'त्या' लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय मात्र सेल्फी काढण्यात मग्न आहेत. यांना लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री या संवेदनशील वागण्याची दखल घेणार का?, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :मनसेराज ठाकरेगिरीश महाजनपूरकोल्हापूर पूर