“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:49 IST2025-12-25T11:46:30+5:302025-12-25T11:49:19+5:30
MNS Bala Nandgaonkar Social Media Post: गाफिल राहू नका, तुम्ही जागे व्हा दुसऱ्यांना जागे करा. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
MNS Bala Nandgaonkar Social Media Post: अनेक दिवसांपासून राज्याला ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता होती. युतीमुळे ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. या युतीमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात, काय परिणाम होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. हा ऐतिहासिक क्षण राज ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार बाळा नांदगावकर यांना अनुभवता आला नाही. बाळा नांदगावकर प्रकृतीच्या कारणास्तव संयुक्त पत्रकार परिषदेवेळी उपस्थित नव्हते. सोशल मीडियावर पोस्ट करत बाळा नांदगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, याच आपल्या भूमिकेला पुढे नेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा केली. मुंबई महापालिकेत आम्ही एकत्र लढू आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणूकही एकत्र लढण्याची घोषणा लवकरच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईचा महापौर 'मराठी' आणि तो आमचाच असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजपला काय हवे ते भाजपने बघावे, मराठी माणसाला काय हवे ते आम्ही बघू, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.
अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले
अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले. संयुक्त महाराष्ट्र म्हणजे ‘मुंबई’ सह महाराष्ट्र मिळवण्यासाठी जी चळवळ झाली त्यामध्ये १०७ हुतात्मे झाले, त्यानंतर आपल्याला आजचा महाराष्ट्र दिसतो ज्याची राजधानी मुंबई आहे. ह्या चळवळीमध्ये अग्रणी नाव होत म्हणजे ‘ठाकरे’. प्रबोधनकारांपासून ठाकरे घराण्याला समाजकारणाचा वारसा आहे, त्याला राजकीय स्वरूप बाळासाहेबांनी दिले व त्यातुन ‘शिवसेना’ जन्माला आली.
शिवसेनेने अनेक आंदोलने केली त्याचा फायदा विविध क्षेत्रातील मराठी मान्यवरांना झाला व मुंबईचे मराठीपण त्यातुन टिकून राहिले. मधल्या काही काळात दोघा भावंडांमध्ये वितुष्ट आले पण दोघांची महाराष्ट्रप्रेमाची व हिंदुत्वाची नाळ तुटली नाही व तुटणारही नाही, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी पोस्टमधून व्यक्त केला आहे.
मराठीद्वेष्ट्या सरकारसाठी ही धोक्याची घंटा
कोणताही वाद महाराष्ट्र धर्मापेक्षा मोठा नाही, ह्या वाक्याला समजून दोन्ही भाऊ आज महाराष्ट्र व मुंबईच्या प्रेमासाठी एकत्र आले ही आपल्या मराठी जनमानसांसाठी मोठी गोष्ट आहे. केंद्रात व महाराष्ट्रात असलेल्या मराठीद्वेष्ट्या सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे. आत्ताची महापालिका निवडणूक ही नेहमीसारखी निवडणूक नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. २० वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र येत आहे ते महाराष्ट्रासाठी, आपल्या माय मराठीसाठी. मुंबई तसेच महाराष्ट्र वर अधिकार हा पूर्वीही मराठी माणसाचा होता व पुढेही मराठी माणसाचाच राहील, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कृपा करून गाफिल राहू नका, तुम्ही जागे व्हा दुसऱ्यांना जागे करा. आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून आपल्या मुंबईवर आक्रमण करणाऱ्या परक्याना हरवू या. सर्व मराठीजन एकत्र होऊया फक्त मुंबईचे मराठीपण व महाराष्ट्राचे हिंदुत्व राखण्यासाठी. जय हिंद जय महाराष्ट्र …!!!, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.