Join us

संजय निरुपम यांच्याविरोधात मनसेची आक्रमक पोस्टरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 13:07 IST

"उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल," असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई - "उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल," असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय निरुपम हे परप्रांतीय  भटका कुत्रा असून, परप्रांतीय मतांवर डोळा ठेवून ते अशी विधाने करत आहेत, अशी पोस्टरबाजी मनसेकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे.  नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना निरुपम यांनी उत्तर भारतीय मुंबई चालवतात, त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल, असे वादग्रस्त विधान केले होते. उत्तर भारतीय मंडळी महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रात सक्रीय आहेत. हीच माणसं पूर्ण मुंबई चालवतात. त्यांनी जर ठरवलं तर सर्वकाही ठप्प होऊ शकते. त्यामुळे त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका, असे निरुपम यांनी म्हटले होते.  'उत्तर भारतातून महाराष्ट्रात आलेला माणूस सर्व कामं करतो. तुम्ही कोणतंही क्षेत्र सांगा. त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रीय आहेत. उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो. फळं-भाजी विकतो. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे,' असं निरुपम म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्र उत्तर भारतातील मंडळीच चालवतात, असा दावादेखील त्यांनी केला. 'उत्तर भारतीय पूर्ण मुंबई चालवतात. त्यांनी जर ठरवलं, तर मुंबई ठप्प होऊ शकते. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही,' असं निरुपम म्हणाले होते. त्यामुळे आम्हाला काम बंद करायला भाग पडू नका, असा अप्रत्यक्ष इशारादेखील त्यांनी दिला होता.

टॅग्स :मनसेसंजय निरुपमराजकारणमुंबईमहाराष्ट्र