MNS Amit Raj Thackeray News: मुंबई मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) या महत्त्वाकांक्षी मार्गिकेच्या पुलाचा संरक्षक कठडा खालून जात असलेल्या वाहनांवर कोसळला. यात एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले. या दुर्घटनेतील मृताच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देणार आहे. या अपघात प्रकरणी मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत टीका केली आहे.
शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत!!! जनतेच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवा! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा 'अपघात' नाही, तर प्रशासनाने केलेला 'खून' आहे! निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला 'जुगाड' आणि वारंवार ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष... याची जबाबदारी कोण घेणार? एकीकडे सरकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूचे स्लॅब कोसळत असताना, दुसरीकडे सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. जपानची नक्कल करताना सरकार हे विसरतंय की तिथल्या जनतेला ‘जिविताची हमी’ आणि सर्व 'मूलभूत सोयी' मिळाल्या आहेत; आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत घरी परतेल की नाही याची खात्री नसताना हे बालिश हट्ट कशासाठी? अशी विचारणा अमित राज ठाकरे यांनी केली आहे.
सरकार दरबारी दखलही घेतली जात नाही
प्रशासनाचा प्राधान्यक्रम नक्की काय आहे? ज्या गोष्टींची गरज नाही तिथे कोट्यवधी रुपये उधळायचे आणि जिथे लोकांच्या जिवाचा प्रश्न आहे तिथे मात्र रीतसर दुर्लक्ष करायचं? दुर्दैवाने, हा काही पहिलाच 'अपघात' नाही. अशा अनेक घटना मुंबईकरांच्या जीवावर बेतल्या आहेत. कधी पूल कोसळतो, कधी होर्डिंग तर कधी बांधकामाचे स्लॅब अंगावर पडून निष्पाप लोकांचे प्राण जातात. जास्तीत जास्त चौकशीचे आदेश दिले जातात, पण परिस्थिती बदलत नाही. अनियंत्रित गर्दीमुळे होणारे रेल्वे अपघात, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे लोकांचे जाणारे प्राण याची तर सरकार दरबारी दखलही घेतली जात नाही! धक्कादायक बाब म्हणजे, मुलुंड प्रकरणी कंत्राटदाराला ६ कोटींचा दंड होतो, पण ज्या कुटुंबाचा आधार गेला त्यांना फक्त ५ लाखांची शुल्लक मदत? एखाद्या कुटुंबाची राखरांगोळी झाल्यावर त्यांच्या दुःखाची अशी 'शून्यात' गणना करताना सरकारला लाज कशी वाटत नाही? या शब्दांत अमित ठाकरे यांनी टीका केली आहे.
दरम्यान, नुकतीच अमेरिकेतील एका अपघाताची बातमी आपण वाचली. तिथल्या प्रशासनाच्या चुकीमुळे एका भारतीय मुलीचा मृत्यू झाला, तेव्हा तिथल्या सिस्टीमने जबाबदारी स्वीकारून कोट्यवधींची भरपाई दिली. प्रगत राष्ट्रांमध्ये माणसाच्या जिवाला किंमत असते, पण आपल्याकडे? आपल्याकडे लोकांच्या जिवापेक्षा सरकारला 'इव्हेंटबाजी' महत्त्वाची वाटते. आम्हाला गाणी गाणारे रस्ते नकोत, तर दर्जेदार रस्ते हवे आहेत! मुंबईकर टॅक्स भरतोय तो तुमच्या ‘इनोव्हेटिव्ह स्टंट’साठी नाही, तर एका सुरक्षित आयुष्यासाठी ... त्यामुळे हे असले 'म्युझिकल' नखरे थांबवा आणि आधी लोकांना एक सुरक्षित आयुष्य देण्याची ‘बेसिक’ मागणी पूर्ण करा. जनतेच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवा!, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.
Web Summary : Amit Thackeray criticizes government negligence after a Mulund accident caused a fatality due to faulty metro construction. He demands accountability, criticizes prioritizing cosmetic projects over safety, and questions inadequate compensation to victims' families, urging focus on basic safety needs.
Web Summary : अमित ठाकरे ने मुलुंड दुर्घटना में लापरवाही के लिए सरकार की आलोचना की। उन्होंने सुरक्षा से अधिक कॉस्मेटिक परियोजनाओं को प्राथमिकता देने पर सवाल उठाया और पीड़ितों के परिवारों को अपर्याप्त मुआवजे की आलोचना की, बुनियादी सुरक्षा आवश्यकताओं पर ध्यान केंद्रित करने का आग्रह किया।