शिंदे गटाविरोधात संतापाची लाट उसळलीय; लवकरत तो गट संपुष्टात येणार, सुनिल राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 19:15 IST2022-10-10T19:07:27+5:302022-10-10T19:15:23+5:30
आमदार सुनिल राऊत यांनी शिंदे गटातील सर्व बंडखोर आणि आमदारांवर टीका केली आहे.

शिंदे गटाविरोधात संतापाची लाट उसळलीय; लवकरत तो गट संपुष्टात येणार, सुनिल राऊतांचा दावा
मुंबई - शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यासाठी शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असताना निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना धक्का देत पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा मोठा निर्णय घेतला. शिवसेना हे नाव आता दोन्ही गटांना वापरता येणार नाही. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेच्या इतिहासातील या आजवरच्या सर्वात मोठ्या घडामोडींमुळे शिवसेनेवर मोठं संकट उभं राहिलं आहे.
"कितीही प्रयत्न केले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हा ब्रँड पुसू शकत नाही"
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. चिन्ह आणि नाव नसल्याने फरक पडत नाही. बाळासाहेबांचे विचार आणि दृष्टीकोन घेऊन आपण पुढे चालत राहू. ही आपली शेवटची आरपारची लढाई आहे. ही लढाई आपण जिंकलो तर जगातील कुठलीही शक्ती आपले वाकडे करू शकणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर आमदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिंदे गटाविरोधात एक संतापाची लाटू उसळू लागली आहे. ही लाट येणाऱ्या निवडणुकीत मतपत्रिकेत उतरेल आणि शिंदे गट संपुष्टात येईल, अशा प्रकारचे वातावरण या राज्यात दिसून येत असल्याचं सुनिल राऊत यांनी सांगितलं.
शिवसेनेचं राजकीय रडगाणं, स्वायत्त संस्थांना कमकुवत करण्याचं काम; फडणवीसांची टीका
धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेने त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. तर दुसरीकडे तलवार, गदा आणि तुतारी हे तीन पर्याय शिंदे गटाकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर लवकरच निवडणूक आयोग निर्णय घेणार असून, अवघ्या देशाचे लक्ष याकडे लागले आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर उद्याच सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"