महिलेने स्वत:चे नाव कसे लिहायचे? नवा जीआर येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 09:17 IST2025-03-13T09:16:32+5:302025-03-13T09:17:03+5:30
स्वत:चे नाव, मग आईचे, वडिलांचे, आडनाव लिहिताना उडते तारांबळ

महिलेने स्वत:चे नाव कसे लिहायचे? नवा जीआर येणार
मुंबई : आपल्या नावानंतर आधी आईचे, मग वडिलांचे आणि नंतर आडनाव लिहिण्याची पद्धत सध्या आली आहे. पण, महिलांना त्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. तेव्हा याबाबत राज्य सरकारने स्पष्टता आणावी, अशी मागणी आ. सना मलिक यांनी बुधवारी विधानसभेत केली. त्यावर या संबंधीचा सुस्पष्ट शासन निर्णय काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सना मलिक म्हणाल्या की, माझ्या नावानंतर वडिलांचे आणि नंतर आडनाव असे पूर्वीपासून मी लिहित होते. लग्नानंतर माझ्या नावानंतर पतीचे नाव आणि त्यांचे आडनाव असे लिहू लागले. मध्येच आईचे नाव लिहिण्याची पद्धत आली. आता नावात काय काय लिहावे, हा प्रश्न मला पडला आहे. आईच्या नावानंतर पतीचे नाव आणि त्यांचेच आडनाव लिहावे लागते. त्यातून आणखीच गोंधळ होतो. माझी पूर्वीची कागदपत्रे ही माहेरच्या नावाने आहेत.
नेमका नियम काय?
उद्धवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी असा मुद्दा मांडला की, अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये मंत्री, आमदारांच्या नावानंतर त्यांच्या आईचे नाव नमूद केलेले असते.
पण, त्याच निमंत्रण पत्रिकेत अधिकाऱ्यांच्या नावासमोर आईचे नाव नसते. नेमका नियम काय आहे आणि तो सगळ्यांसाठी लागू आहे का, याची स्पष्टता असली पाहिजे.
नावाबाबत काय होता आदेश?
१ एप्रिल २०२४ नंतर जन्मलेल्या बालकांच्या नावाच्या पुढे आधी त्याचे आणि नंतर आईचे व नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव लिहिले जाईल, असा आदेश महायुती सरकारने काढला होता.
अनेक लोकप्रतिनिधींनी या निर्णयात आईचा सन्मान असल्याने स्वत:च्या नावासमोर आईचे नाव लिहायला सुरुवात केली. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री, अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या त्यानुसार बदलण्यात आल्या होत्या.
सना मलिक यांच्या प्रश्नावर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले निर्देश
वेगवेगळी नावे असली तर कायदेशीरदृष्ट्याही अडचणी येऊ शकतात. विशेषत: महिलांच्या एकाच नावात आईचे, पतीचे, पित्याचे नाव, आडनाव कसे लिहायचे, असा प्रश्न अजित पवार गटाच्या आ. सना मलिक यांनी केला.
अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, सना मलिक यांनी अतिशय महत्त्वाचा विषय मांडला आहे. राज्य सरकारने एक नवीन जीआर काढून स्पष्टता आणावी. त्यावर तसा जीआर काढला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला सांगितले.