Join us

कायद्याचे उल्लंघन झालं पण अशा माणसाला मारण्याचं जराही दु:ख नाही - गीता जैन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 18:09 IST

मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी कानशिलात लगावली आणि राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले.

मुंबई : मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी कानशिलात लगावली आणि राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले. विविध राजकीय पक्षातील नेते मंडळींनी आमदार जैन यांच्यावर टीका केली. संबंधित अभियंत्याने कुटुंब राहत असलेल्या घरावर तोडक कारवाई करण्यासाठी पथक पाठवले होते, त्या पथकात ते अभियंताही सहभागी होती. त्यामुळे, संतापलेल्या आमदार गीता जैन यांनी अभियंत्याची कानउघडणी करत कानशिलात लगावली. याबद्दल स्पष्टीकरण देताना जैन यांनी कायद्याचे उल्लंघन झाले असले तरी अशा माणसाला मारण्याचे जराही दु:ख नसल्याचे सांगितले.

मंगळवारी झालेल्या प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण देताना आमदार गीता जैन यांनी म्हटले, "जे झालं त्याला मी माघारी घेऊ शकत नाही. पण अशा माणसाला मारण्याचं मला जराही दु:ख नाही. होय, कायद्याचं नक्कीच उल्लंघन झालं आहे आणि मी कायदेशीर कारवाईला सामोरे जायला तयार आहे. तेव्हा मला खूप राग आला होता आणि म्हणूनच काही नाही आठवलं अन् कायद्याचं उल्लघन झालं." त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

गीता जैन यांच्या कृत्यावरून वाद आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांची कॉलर धरून कानशीलात लगावली. येथील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या राहत्या घरावर तोडक कारवाईसाठी या अभियंत्यांच्या नेतृत्त्वात पथक गेले होते. त्यामुळे पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी आमदार जैन यांनी अभियंत्यास सरकारी नियम आणि माणुसकी शिकवत चांगलाच धडा शिकवला. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचं काम करता, तुम्ही माणसं आहात की राक्षस असं म्हणत आमदार जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली. पण जैन यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी लक्ष्य केले. 

दरम्यान, आमदारांचे शब्द ऐकताना अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने आमदार गीत जैन यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या थेट कानशिलात लगावली. दरम्यान, पावसाळ्यात राहती अनधिकृत घरे तोडू नयेत असे आहेत शासन आदेश आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

  

टॅग्स :मीरा-भाईंदरभाजपाआमदारमुंबई