"मी गोल्डी ब्रार बोलतोय, पुढील दोन दिवसांत…", कॉंग्रेस आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 18:27 IST2023-10-08T17:17:41+5:302023-10-08T18:27:34+5:30

आमदार शेख यांचे स्वीय सहायक आणि वकील विक्रम कपूर यांनी या संदर्भात मुंबईतील मालाड परिसरातील बांगूर नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. 

MLA Aslam Shaikh receives death threats from Canadian 'gangster' Goldy Brar | "मी गोल्डी ब्रार बोलतोय, पुढील दोन दिवसांत…", कॉंग्रेस आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी

"मी गोल्डी ब्रार बोलतोय, पुढील दोन दिवसांत…", कॉंग्रेस आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई :  काँग्रेस आमदार आणि राज्याचे माजी मंत्री अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोनद्वारे धमकी देताना या व्यक्तीने आपली ओळख गोल्डी ब्रार असल्याचे सांगितले आहे. आमदार शेख यांचे स्वीय सहायक आणि वकील विक्रम कपूर यांनी या संदर्भात मुंबईतील मालाड परिसरातील बांगूर नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अस्लम शेख यांचे स्वीय सहाय्यक आणि वकील विक्रम कपूर यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विक्रम कपूरच अस्लम शेख यांना आलेले फोन उचलतात. अस्लम शेख यांना ५ ऑक्टोबर रोजी फोन आला असल्याची माहिती कपूर यांनी तक्रारीत दिली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून फोन कोठून आला याचा तपास सुरु केला आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख गोल्डी ब्रार अशी करुन दिली. तो म्हणाला, "मी गोल्डी ब्रार बोलतो आहे. मी अस्लम शेख याला गोळ्या घालून दोन दिवसात संपवणार आहे. हे अस्लम शेख यांना सांगा." यानंतर विक्रम कपूर यांनी पोलिसांना कॉलची तत्काळ तक्रार केली आणि त्यांना कॉलरशी संबंधित दोन फोन नंबर दिले. यावेळी बांगूरनगर पोलिसांनी विक्रम कपूर कपूर यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी कलम ५०६(२) आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, गोल्डी ब्रार हा सतींदरजीत सिंह नावाने ओळखला जातो. जो सध्या फरार असून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गँगशी संबंधित आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खान याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीत गोल्डी ब्रारचे नाव चर्चेत आले होते. याशिवाय, अलिकडील काळात राजकीय नेते आणि सेलिब्रेटी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचे तसेच सार्वजणिक ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, संदेश देण्याचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: MLA Aslam Shaikh receives death threats from Canadian 'gangster' Goldy Brar