तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 07:20 IST2025-11-10T07:19:39+5:302025-11-10T07:20:01+5:30
Tw Police Officers Suspended: ओशिवरा पोलिस ठाण्यात दोन गटांतील वाद सोडवताना तक्रारदारांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर ५ पोलिसांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
मुंबई - ओशिवरा पोलिस ठाण्यात दोन गटांतील वाद सोडवताना तक्रारदारांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर ५ पोलिसांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
जोगेश्वरीच्या आनंद नगर परिसरात ४ नोव्हेंबर रोजी दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी एका दुकानदारावर हल्ला झाल्याने तणाव झाला. त्याच्या समर्थनार्थ एका पक्षाचे कार्यकर्ते ठाण्यात आले. त्याचवेळी लैंगिक अत्याचाराची तक्रार देण्यासाठी एक महिला ठाण्यात आली होती. या महिलेला न्याय मिळावा, यासाठी त्या पक्षाच्या स्थानिक नेत्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. ठाण्याच्या आवारात कार्यकर्त्यांशी काही पोलिसांच्या गैरवर्तनाचा आरोप आहे.
सात दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी: सहायक पोलिस निरीक्षक
रमेश केंगार आणि सहायक निरीक्षक गणेश गायके यांना निलंबित करण्यात आले आहे. उपनिरीक्षक बाबू तोटरे, दीपक बर्वे आणि शिपाई अजिम झारी यांच्यासह इतर दोन पोलिसांविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. वांद्रे विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सात दिवसांत प्राथमिक चौकशी करतील.