एअरलाइन्स धमकी प्रकरणात अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात, चार दिवसांची पोलिस कोठडी; खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:03 IST2024-10-16T14:02:49+5:302024-10-16T14:03:03+5:30
तांत्रिक तपासणीत त्यानेच सोशल मीडियावर बॉम्बच्या धमकीचे संदेश पोस्ट केल्याचे उघड झाले. प्राथमिक तपासात या मुलाने किरकोळ वादातून एका व्यक्तीला त्रास देण्यासाठी हे सर्व केले असून, तो छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्यातील आहे.

एअरलाइन्स धमकी प्रकरणात अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात, चार दिवसांची पोलिस कोठडी; खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट
मुंबई : मुंबईतील इंडिगोच्या दोन आणि एअर इंडियाची एक अशा तीन आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सला बॉम्बच्या धमकीप्रकरणी सहार पोलिसांनी मंगळवारी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तो अकरावीचा विद्यार्थी आहे.
तांत्रिक तपासणीत त्यानेच सोशल मीडियावर बॉम्बच्या धमकीचे संदेश पोस्ट केल्याचे उघड झाले. प्राथमिक तपासात या मुलाने किरकोळ वादातून एका व्यक्तीला त्रास देण्यासाठी हे सर्व केले असून, तो छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्यातील आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला जुव्हेनाइल जस्टिस बोर्डासमोर उभे केले. त्यानंतर, त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
सोमवारी मुंबईतील इंडिगो आणि एअर इंडिया एअरलाइन्सला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. यामुळे मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग बदलावा लागला. सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीनंतर तो निव्वळ खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई-न्यूयॉर्कमधील एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये २३९ प्रवासी आणि १९ क्रू सदस्य होते. धमकी मिळाल्यानंतर हे उड्डाण दिल्लीकडे वळविले.
ही धमकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून मिळाली होती. या उड्डाणाला मंगळवारी दिल्लीहून पुन्हा शेड्युल करण्यात आले. इंडिगोच्या मुंबई-मस्कट आणि मुंबई-जेद्दाह उड्डाणांनाही धमक्या मिळाल्या होत्या, ज्यामुळे सुरक्षा प्रोटोकॉलमुळे तासभर उशीर झाला, परंतु सोमवारीच यांचे उड्डाण झाले. धमकीनंतर सहार पोलिसांनी ज्या दोन हँडल्सचा वापर करून बॉम्बची खोटी
माहिती पोस्ट केली, त्याची तांत्रिक तपासणी करत राजनंद गावातून त्या मुलाला ताब्यात घेतले.
काय होती धमकी?
मुंबई-मस्कट फ्लाइटमध्ये बॉम्ब आहेत आणि एअर इंडिया फ्लाइटमध्ये ६ किलो आरडीएक्स व सहा दहशतवादी आहेत, अशा मजकुराची पोस्ट सोशल मीडियावरून करण्यात आली होती.