“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:40 IST2025-08-11T15:35:08+5:302025-08-11T15:40:57+5:30

Minister Pratap Sarnaik News: राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

minister pratap sarnaik informed that state government approval for student school vans | “विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक

“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक

Minister Pratap Sarnaik School Van News: शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनाधिकृत  रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.   

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१  आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. सदर वाहने  BS-VI या श्रेणीतील असणार आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

केंद्राच्या मानकानुसार राज्य शासनाची नियमावली

राज्य सरकारकडून परिवहन विभागामार्फत सन २०१८ पर्यंत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते. मात्र स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या मानकानुसार राज्य शासनाने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे राज्य सरकारने हे धोरणात्मक पाऊल टाकले असून  या संदर्भात अधिसूचना जारी होईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. 

दरम्यान, स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. चार चाके असल्याने वाहन उलटण्याची शक्यता नगण्य असते. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीला प्रथम प्राधान्य आहे. सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅनला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य सरकारकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

स्कूल व्हॅनमधील वैशिष्ट्ये

- जीपीएस
- सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन
- अग्निशमन अलार्म प्रणाली
- दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा
- ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर
- पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे
- स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी
- गाडीच्या छतावर शाळेचे नाव

 

Web Title: minister pratap sarnaik informed that state government approval for student school vans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.