दिशा सालियनचे वडील मुद्दाम कोणाचं नाव घेतील का? नितीन राणे म्हणाले, "पिक्चर अभी बाकी है"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:43 IST2025-07-03T17:36:31+5:302025-07-03T17:43:39+5:30
दिशा सालियन प्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या अहवालावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली

दिशा सालियनचे वडील मुद्दाम कोणाचं नाव घेतील का? नितीन राणे म्हणाले, "पिक्चर अभी बाकी है"
Nitesh Rane on Disha Salian Death Case: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह दिशाच्या सालियनच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप केला होता. मात्र आता दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी बुधवारी हायकोर्टात केला. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिशा सालियनने आत्महत्याच केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं. दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांनी पिक्चर अभी बाकी है म्हणत इशारा दिला आहे.
दिशा सालियन प्रकरणात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी सतिश सालियन यांनी याचिका दाखल केली होती. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र कोर्टात मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिशा सालियन हिची आत्महत्याच असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र नितेश राणे यानी दिशाच्या वडिलांनीच आदित्य ठाकरेविरोधात तक्रार केली होती असं म्हटलं.
"हे प्रकरण कोर्टात असून त्याबद्दल किती भाष्य करायचं याबाबत प्रश्नचिन्ह आहे. हा फक्त माझा किंवा राजकीय विषय नाही. ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते दिशा सालियनचे वडील ते स्वतः आरोप करणार आहेत का? ते कोणाचं नाव मुद्दामहून घेणार आहेत का? त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे, दिनो मोरया या सगळ्यांची नावं दिली होती. यांची नावे दिशा सालियनच्या वडिलांनी घेतली आहेत. मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी है. कोर्टाने १६ तारीख दिली आहे. त्या दिवशी काय होतं हे आपण बघुया. राज्य सरकार आणि आताच्या पोलिसांना जे नजरेसमोर दिसलं असेल तोच अहवाल त्यांनी योग्यपद्धतीने दिला," असं नितेश राणे म्हणाले.
नारायण राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागायला पाहिजे - संजय राऊत
"पोलीस तर आमचे नाहीत, एसआयटीही आमची नाही. तुम्हीच ती स्थापन केली होती. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आलं, त्यांना बदनाम करण्यात आलं. शेवटी सत्य समोर येत आहे. सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी. त्यानंतर नारायण राणे यांचा मंत्री असलेल्या मुलाने नाक घासून माफी मागायला पाहिजे,"असे संजय राऊत म्हणाले.