मंत्री नवाब मलिकांनी उडवली नितेश राणेंची खिल्ली, शेअर केला 'कॉक'टेल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 17:22 IST2021-12-24T14:44:13+5:302021-12-24T17:22:45+5:30
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते.

मंत्री नवाब मलिकांनी उडवली नितेश राणेंची खिल्ली, शेअर केला 'कॉक'टेल फोटो
मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कॉपी आणि माफीने गाजला. आमदार भास्कर जाधव यांनी मोदींची केलेली नक्कल पहिल्या दिवशी चर्चेत होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आपण हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचा मुद्दाही गाजला. त्यानंतर, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरेंची एंट्री होताना आमदार नितेश राणेंनी त्यांची उडवलेली खिल्ली महाराष्ट्रभर व्हायरल झाली. आता, नितेश राणेंना महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेनेनंतर मंत्री नवाब मलिक यांनी फोटो शेअर करत नितेश राणेंची खिल्ली उडवली आहे.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव... असा आवाज काढला. नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. आता, राणेंच्या या व्हिडिओला पाहिल्यानंतर शिवसेनेनंतर आता मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. नवाब मलिक यांनी एक वेगळाच फोटो शेअर करत नितेश राणेंची खिल्ली उडवली.
पैहचान कौन ? pic.twitter.com/zNCdvKazH8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 24, 2021
मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोंबड्याचा फोटो शेअर केला आहे. मात्र, या कोंबड्याचा चेहरा मांजरीसारखा दिसून येतो. म्हणजेच, हा कोंबडा मांजर मिश्रित असून हा फोटो कॉकटेल असल्याचं म्हणता येईल. मंत्री मलिक यांनी नितेश राणेंनी एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे.
शिवसेनेनं लगावला टोला
''मांजर आडवं गेले तरी थांबू नये, ही प्रबोधनकारांची थोर शिकवण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तंतोतंत पाळली!'', असे ट्विट शिवसेना आमदार डॉ. मनिष कायंदे यांनी केलं आहे. त्यासोबतच, म्याव.. म्याव... हा हॅशटॅगही त्यांनी वापरला. नितेश राणेंच्या कृत्यावर आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय.
म्हणून म्याव म्याव केलं - राणे
विधिमंडळातील सदर कृत्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हो, मी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव, म्याव केलं. कारण आधी वाघाची डरकाळी देणाऱ्या शिवसेनेची अवस्थाच म्याव, म्याव सारखी झाली आहे, असं नितेश राणे यांनी सांगितलं. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंनी आमदार भास्कर जाधव यांना सोंगाड्या म्हटले आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. विधानसभा सभागृहात त्यांनी मोदींची नक्कल केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.