आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत; विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 06:42 IST2026-03-26T06:42:31+5:302026-03-26T06:42:31+5:30
Narhari Zirwal Viral Video Controversy: या संदर्भात झिरवाळ यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांचे मोबाइल स्विच्ड् ऑफ होते. अशा व्हिडीओची आम्हाला काहीही कल्पना नाही, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत; विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. या कथित व्हिडीओत झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावानेच पत्र परिषद घेऊन केला. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या संदर्भात झिरवाळ यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांचे मोबाइल स्विच्ड् ऑफ होते. अशा व्हिडीओची आम्हाला काहीही कल्पना नाही, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना यासंदर्भात विचारले असता, मी तो व्हिडीओ पाहिला नाही, पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया देणे योग्य होईल असे ते म्हणाले. झिरवाळ हे राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री आहेत. मात्र, यासंदर्भात पक्षाकडूनही कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
राजीनाम्याची मागणी
राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा विनाविलंब घ्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. व्हायरल व्हिडीओची तातडीने चौकशी व्हावी आणि कारवाईदेखील करावी, असेही ते म्हणाले.