धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 06:14 IST2025-01-28T06:14:16+5:302025-01-28T06:14:52+5:30
संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडले ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे अजित पवार यांनी आपल्याला सांगितल्याचे दमानिया म्हणाल्या.

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींच्या अटकेसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सरकारवर दबाव टाकत असून, त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. या हत्येशी संबंधित आरोपी आणि अन्य लोकांच्या कथित सहभागाविषयीची कागदपत्रे तसेच अन्य पुरावे त्यांनी या भेटीत अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बीड व धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. दमानिया यांनीही या प्रकरणात मुंडे यांनाच लक्ष्य केले आहे. त्यामुळे दमानिया यांच्या या भेटीनंतर मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मंगळवारी दुपारी १२ वाजता अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे, या बैठकीत आपण दिलेली कागदपत्रे आणि अन्य पुरावे याविषयी ते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडले ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे अजित पवार यांनी आपल्याला सांगितल्याचे दमानिया म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर अजित पवार धनजंय मुंडेंचा राजीनामा घेणार असल्याचा दावाही दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी काही कंपन्यांचे आर्थिक ताळेबंद अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. यानंतरही जर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दमानिया यांनी दिला आहे.
...तर धनंजय मुंडे यांना फडणवीस राजीनामा द्यायला लावतील !
सांगली : मस्साजोग (जि. बीड)चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटले की, या प्रकरणात काही तथ्य आहे तर ते ताबडतोब मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
घुलेचा मोबाइल लॉक
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला न्यायालयीन कोठडीतून काढून पुन्हा एकदा ३१ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी मिळाली आहे.