बेस्ट सेवेतील एस.टी. कर्मचाऱ्यांना रोज २२५ रूपये भोजनभत्ता देणार..!; अनिल परब यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 15:02 IST2020-11-05T15:00:59+5:302020-11-05T15:02:53+5:30
या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत एका खाजगी संस्थेला देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.

बेस्ट सेवेतील एस.टी. कर्मचाऱ्यांना रोज २२५ रूपये भोजनभत्ता देणार..!; अनिल परब यांची घोषणा
मुंबई -बेस्टच सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे. गेली दोन महिने एसटीच्या सुमारे १ हजार बसेस मुंबईतील बेस्ट वाहतुकीच्या मदतीसाठी धावत आहेत. त्यासाठी सुमारे ४ हजार ५०० पेक्षा अधिक एस.टी. कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या सेवेत आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत एका खाजगी संस्थेला देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्याकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन सदर खाजगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा, असे निर्देश मंत्री परब यांनी दिले होते. त्यानुसार एसटी प्रशासनातर्फे त्वरित कार्यवाही करून सदर भोजन व्यवस्था बंद करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्याची व्यवस्था केली आहे.
परब यांनी दिलेल्या निर्देशानुसार, कर्मचारी राहत असलेल्या निवासव्यवस्थेची रोजच्या रोज पाहणी करण्यासाठी मध्यवर्ती व क्षेत्रिय कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ७ पथके तयार करण्यात आली असून, त्याच्यांव्दारे कर्मचाऱ्यांना पुरवविण्यात येणाऱ्या निवासव्यवस्थेबाबत अहवाल मध्यवर्ती कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.
यापुढे, बेस्ट सेवेसाठी राज्यातील विविध भागातून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत राहण्याची व जेवणाची कोणतीही गैरसोय होऊ नये, याबाबतची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देशही परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.