Budget 2021: "राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, तेथे मदत करु नका असं मोदींना सांगतात की काय?"

By मुकेश चव्हाण | Published: February 1, 2021 07:43 PM2021-02-01T19:43:07+5:302021-02-01T19:44:25+5:30

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. 

Minister and NCP leader Jayant Patil has criticized the central government's budget | Budget 2021: "राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, तेथे मदत करु नका असं मोदींना सांगतात की काय?"

Budget 2021: "राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, तेथे मदत करु नका असं मोदींना सांगतात की काय?"

googlenewsNext

मुंबई/ नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोना कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. सुरुवातीलाच लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भात माहिती देताना केंद्र सरकारने दिलेल्या योजनांचाही निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केला. 

निर्मला सीतारामन अर्थसंकल्पानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर  सत्ताधाऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे.  जयंत पाटील अर्थसंकल्पाबाबत बोलताना म्हणाले की, मोदी सरकारने सगळं विकायला काढलं आहे. मागच्या सरकारने जे बनवलं, ते हे विकत आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळालं नाही. महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, त्यामुळे मदत करु नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगताती की काय, असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

कोरोनानंतर सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. मात्र या अपेक्षा भंग झाल्या आहेत. देशातील महागाई वाढली आहे. विकास दर खाली गेला आहे. बेरोजगारी वाढली आहे. आता कोरोना काळात कारखानदारी चालू करण्यासाठीही काही व्यवस्था केलेली नाही. या देशात उद्योगांना सुरू करणे गरजेचे होतं, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.  75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.  

खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा- संजय राऊत

केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागते, पण महाराष्ट्राला काय दिलं, त्यांच्या खिशात काय आहे? खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, तसे हे दिल्लीचे बाजीराव, असे म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवली, पण महाराष्ट्रावर कायम अन्याय झालाय. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे सरकार पाहत नाहीत.  सध्या, आकड्यात पडायचं नाही, किती खरे-किती खोटे हे सहा महिन्यांनी कळतं. आता, आर्थिक थापा मारणं बंद केलं पाहिजे, सामान्य जनतेला पोटाची भाषा कळते, तरुणांना रोजगाराची भाषा कळते, असे म्हणत संजय राऊत यांनी सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळाले? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

फडणवीसांकडून अर्थमंत्र्यांचे आभार-

अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले आहे. तसंच, केंद्र सरकारनं नाशिक मेट्रोचं मॉडेल स्वीकारलं ही आनंदाची बाब आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारलं जाईल. हे विकासाचे आणि नवनिर्माणाच्या धोरणाचे यश आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी ५९७६ कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अतंर्गत देण्यात आल्याची माहित देत देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

Web Title: Minister and NCP leader Jayant Patil has criticized the central government's budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.