मंत्री सत्तार अन् खासदारांच्या टक्केवारीचा व्हिडिओ; काँग्रेसकडून चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 01:37 PM2024-01-07T13:37:34+5:302024-01-07T14:08:05+5:30

खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप केला

Minister abdul Sattar-Khasdar hemant patil percentage video; Congress varsha gaikwad demands inquiry | मंत्री सत्तार अन् खासदारांच्या टक्केवारीचा व्हिडिओ; काँग्रेसकडून चौकशीची मागणी

मंत्री सत्तार अन् खासदारांच्या टक्केवारीचा व्हिडिओ; काँग्रेसकडून चौकशीची मागणी

मुंबई - शिवसेनेतील फुटीनंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झालं. त्यानंतर, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी, विरोधकांनी गद्दार... गद्दार... म्हणून शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. मात्र, शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं एका घटनेवरुन समोर आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात शिंदे गटात बेबनाव असल्याचे पाहायला मिळालं. मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्या शिवीगाळवरुन काँग्रेसने राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. तसेच, हे सरकार टक्केवारीचं सरकार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरुवातीलाच खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना थेट शिवीगाळ केली. त्यामुळे ऑनलाईन बैठकीत पाटील यांचा माईक म्युट करून पुढील बैठक घेण्याची वेळ आली. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, माध्यमांतही याचे फुटेज पाहायला मिळाले. त्यामुळे, विरोधकांच्या हाती आयतं कोलित सापडलं. त्यावरुन, माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ शेअर करत मंत्री अब्दुल सत्तारांच्या चौकशीची मागणी केली आहे.  

एकमेकांना अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करणारे हे दोन्ही महोदय शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आहेत. एक महोदय शिंदेंच्या सरकारात मंत्री पदावर विराजमान आहेत, तर दुसरे हिंगोलीचे खासदार आहेत. यांच्यातल्या भांडणात अभद्र भाषेचा वापर तर खेदजनक आहेच; पण यापेक्षा ही एक बाब गंभीर असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. 

खासदार महोदयांनी भर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्र्यांवर निधीवाटप करताना टक्केवारीचं शेण खाल्ल्याचा गंभीर आरोप केला आहे. या बैठकीला इतर जनप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते. म्हणजेच शिंदे सरकारमधील मंत्री टक्केवारी घेऊन काम करतात हा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांच्या गटातील खासदारांनी लावला आहे. हे सरकार कशी भ्रष्टाचारयुक्त आहे, याबाबतचे खुलासे आम्ही विरोधकांनी वारंवार केले आहेत, पण आता तर मुख्यमंत्र्यांच्या गटातील खासदारानेच आपली सरकार टक्केवारी सरकार (Commission Sarkar) असल्याचे आरोप केले आहेत. याची तरी चौकशी होणार की नाही?, की चौकशीचा ससेमिरा फक्त विरोधकांचा आवाज दाबण्यासाठीच आहे?, असा सवाल आमदार वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. 

दररम्यान, हिंगोलीत पूर्वीपासूनच सुरू असलेल्या वादाला आता पुन्हा फोडणी बसली आहे. आधी आ.बांगर यांची नाराजी, आता खा. पाटील यांची नाराजी होत असल्याचे दिसत आहे. १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Minister abdul Sattar-Khasdar hemant patil percentage video; Congress varsha gaikwad demands inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.