लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांचे स्थलांतर, परप्रांतात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:41 AM2021-04-03T08:41:38+5:302021-04-03T08:42:16+5:30

राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन नेमका कधी लागू होईल, याचे उत्तर माहीत नसले तरी गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये झालेले हाल पुन्हा हाेऊ नयेत, या भीतीने शहरातील मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे.

Migration of workers for fear of lockdown, trains going abroad are full | लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांचे स्थलांतर, परप्रांतात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांचे स्थलांतर, परप्रांतात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

googlenewsNext

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन नेमका कधी लागू होईल, याचे उत्तर माहीत नसले तरी गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये झालेले हाल पुन्हा हाेऊ नयेत, या भीतीने शहरातील मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. परिणामी उत्तर प्रदेश, बिहार, पटना, झारखंडला जाणाऱ्या गाड्या फुल्ल भरून जात आहेत.
सध्या केवळ आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे ज्यांना आरक्षित तिकीट मिळाले नाही, त्यांनी तत्काळ तिकीट काढण्यावर भर दिला आहे. काेराेनाच्या संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले. लॉकडाऊनमध्ये मजूर, कामगारांचे प्रचंड हाल झाले. हाताला काम नसल्याने उपासमार झाली. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने अनेकांनी पायीच चालत आपले मूळ गाव गाठले, तर अवैधरीत्या वाहनांमधून प्रवास करताना झालेल्या अपघातांमध्ये किती तरी मजुरांनी आपले जीव गमावले. त्या दिवसांची पुनरावृत्ती नकाे, या भीतीने आताच मजुरांनी आपल्या गावी जाणे पसंत केले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली तर राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धूसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघू व्यावसायिक, राेजंदारीवरील मजूर टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकाेत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या २० गाड्या चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पटणाकरिता धावतात. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. एलटीटी - गाेरखपूर, एलटीटी - वाराणसी, एलटीटी - पटना, एलटीटी-दरभंगा गाड्यांत प्रवाशांची संख्या माेठी आहे. राज्यातील मजूरही गावी परतत आहेत. मात्र काही जिल्ह्यांतील निर्बंधांमुळे तेथील एसटीच्या फेऱ्या कमी झाल्याने प्रवासी घटले आहेत.

Web Title: Migration of workers for fear of lockdown, trains going abroad are full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.