म्हाडाच्या संक्रमण शिबिरांची होणार लवकरच दुुरुस्ती; रहिवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:56 AM2019-11-19T00:56:42+5:302019-11-19T00:56:54+5:30

दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या निधीची तरतूद

MHADA transit camps to be repaired soon; Comfort for residents | म्हाडाच्या संक्रमण शिबिरांची होणार लवकरच दुुरुस्ती; रहिवाशांना दिलासा

म्हाडाच्या संक्रमण शिबिरांची होणार लवकरच दुुरुस्ती; रहिवाशांना दिलासा

Next

मुंबई : मुंबईमध्ये विविध ठिकाणी म्हाडाची संक्रमण शिबिरे आहेत. या संक्रमण शिबिरांची दुरुस्ती अनेक वर्षे रखडली होती. संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने हा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. १५ कोटींच्या निधीमध्ये नऊ ठिकाणांच्या संक्रमण शिबिरांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये म्हाडाची ५६ संक्रमण शिबिरे आहेत. यामध्ये एकूण २१ हजार १३५ गाळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी दुरुस्ती न झाल्याने या संक्रमण शिबिरांची अवस्था फार बिकट झाली होती. यावर मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी मुंबईतील वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात बैठका घेऊन संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सरकारकडे म्हाडाने जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी २०० कोटींची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने म्हाडाचाच निधी वापरावा, अशी सूचना केली होती. यानुसार, विशेष बाब म्हणून म्हाडाच्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे़ आता नऊ ठिकाणच्या संक्रमण शिबिरांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.

मुंबईतील उपलब्ध संक्रमण शिबिरातील ८ हजार ४४८ गाळ्यांमध्ये अपात्र अथवा अनधिकृत रहिवासी वास्तव्यास असून, यापैकी काही रहिवासी ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून तेथे राहत आहेत. संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने, या सर्व रहिवाशांच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. निधीअभावी संक्रमण शिबिरातील इमारतींची डागडुजी, गळती, प्लास्टर, रंगकाम, पॅसेजमधील कामे, लादीकरण अशी कामे रखडली होती. आता ही कामे मार्गी लागणार आहेत.

छतावरील शेडसाठी ५ कोटी
मुंबईत म्हाडाच्या जुन्या इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात असून, पावसाळ्याच्या काळात या इमारतींच्या छतातून होणारी गळती रोखण्यासाठी येथे वॉटर प्रूफिंगही केले जाते. यानंतरही गळती थांबत नसल्याने येथील इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. निधीअभावी मागील वर्षी ही योजना राबविता आली नाही. शेडसाठी ५ कोटी इतका निधी उपलब्ध झाला असल्याने, पालिकेच्या परवानगीनंतर छतावरील शेड उभारण्याच्या कामाला टेंडर प्रक्रियेनंतर मान्यता दिली जाणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.

संक्रमण शिबिरांसाठी मंजूर निधी
मागाठणे संक्रमण शिबिर ५० लाख
प्रतीक्षानगर सायन ०७ कोटी
पेरू कम्पाउंड परेल ६० लाख
ज्ञानेश्वरनगर २५ लाख
कन्नमवारनगर विक्रोळी ०४ कोटी
सुभाषनगर चेंबूर १.५ कोटी
चुनाभट्टी २५ लाख
मोतीलालनगर २५ लाख
धारावी १.८ कोटी

Web Title: MHADA transit camps to be repaired soon; Comfort for residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा