म्हाडा कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन'; महिला कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:20 IST2024-12-31T15:20:17+5:302024-12-31T15:20:37+5:30
म्हाडा भवन येथे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे गुरुवारी काही रहिवासी समस्या घेऊन आले होते. त्यावेळी उपाध्यक्ष आणि अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला नाही.

म्हाडा कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन'; महिला कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध
मुंबई : म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि महिला कर्मचारी यांना अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी म्हाडा गृहनिर्माण कर्मचारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना, ग्रुॅज्युएट इंजिनिअर्स असोसिएशन ऑफ म्हाडा या संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत म्हाडा कर्मचाऱ्यांनी सोमवारी सुमारे दोन तास लेखणी बंद आंदोलन केले. अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
म्हाडा भवन येथे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे गुरुवारी काही रहिवासी समस्या घेऊन आले होते. त्यावेळी उपाध्यक्ष आणि अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे एका रहिवाशाने बैठकीमध्ये घुसून गोंधळ घातला. त्याने अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली, तसेच वरिष्ठ अधिकारी आणि महिला कर्मचारी यांना अपशब्द वापरले होते. म्हाडा भवनात घडलेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
लोकाभिमुख उपक्रम यापुढेही सुरूच
- उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी कर्मचाऱ्यांना हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करत नियमित कामकाजाला सुरुवात करून आंदोलन मागे घेतले.
- म्हाडामध्ये लोकशाही दिन आणि जनता दरबार हे लोकाभिमुख उपक्रम यापुढेही सुरूच राहणार, असे जयस्वाल यांनी सांगितले.