लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड :मेट्रोची यावर्षी ५० किमी मार्गिका, पुढील वर्षी ६२ किमी, तर त्याच्या पुढील वर्षात ६० किमी मार्गिका उभारली जाणार आहे. त्यानंतर २०२७ मध्ये मेट्रो प्रवासाचा मार्ग विस्तारेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मीरा रोडच्या काशीगाव ते दहिसर मेट्रो टप्पा १ च्या तांत्रिक चाचणीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मेट्रोत बसून या सर्वांनी दहिसर मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास केला. काशीगाव, मीरागाव, पांडुरंगवाडी आणि दहिसर अशी मेट्रो मार्गिका पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. या मार्गावर आणखी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करायची असल्याने मेट्रो सुरू होण्यासाठी आणखी ६ महिने लागण्याची शक्यता आहे.
स्पीडब्रेकरला जागा नाही
आता आम्ही तिघे एकत्र आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने विकासाची एक्स्प्रेस सुरू केली आहे. आता त्याच्यात कोणी स्पीडब्रेकर आणू शकत नाही. बूस्टर देऊ शकतात. स्पीडब्रेकरला जागा नाही, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
भाईंदरपर्यंतचा टप्पा डिसेंबर २०२६ मध्ये
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान ते अंधेरीपर्यंत मेट्रो जोडली जाईल. ती पुढे वांद्रेपर्यंत करायची आहे. या मेट्रो मार्गिका ठाण्याशी जोडून लूप तयार होईल. जेणेकरून मुंबई व एमएमआरच्या प्रवाशांचा प्रवास सुकर होईल. वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेनलाही मेट्रो त्याला जोडण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही मेट्रो ठाणे-मुंबईला जोडणार असून, भविष्यात पालघर जिल्हाही त्याला जोडला जाईल. काशिगाव मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत तर भाईंदरपर्यंतचा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे शिंदे यांनी सांगितले.
मेट्रो मार्गिकेवरील यंत्रणेची २५ टक्के कामे शिल्लक
ठाण्यातील पहिली मेट्रो मार्गिका असलेल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी बुधवारी पार पडली असली तरी या मार्गावरील यंत्रणेची ७५ टक्के कामे पूर्ण झाली असून स्थापत्य कामे ९६ टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित राहिलेली फिनिशिंग आणि यंत्रणेची कामे सध्या वेगाने सुरू आहेत.
एमएमआरडीएमार्फत उभारल्या जाणाऱ्या या मेट्रो मार्गिकेवर १० स्थानके असतील. पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगावपर्यंतचा ४.४ किलोमीटरचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाईल. आता या मेट्रो मार्गिकेवर दहिसर ते काशीगाव मेट्रो स्थानकादरम्यान अप आणि डाउन लाइनवर मार्गावर चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये गाडीच्या वजनासह चाचण्या, सिग्नलिंग यंत्रणा आणि ट्रॅक्शनच्या चाचण्या केल्या जातील. एकत्रित संचालन आणि आपत्कालीन तयारीच्या चाचणीबरोबरच विविध वेगाने गाडी चालवून पाहिली जाईल. त्यानंतर विविध यंत्रणांकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवरची कोंडी कमी होणार आहे.
या मेट्रोंना जोडली जाणार…
मेट्रो ७ आणि ७ अद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडणी
ही मेट्रो दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २अ शी दहिसर येथे जोडली जाणार, तर डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ बी मार्गिकेवरून थेट मानखुर्दपर्यंत जाता येणार
गायमुख ते शिवाजीचौक मेट्रो १० सोबत मीरागाव येथे जोडली जाणार.
तसेच भविष्यात वसई विरार मेट्रो १३ मार्गिकेशी मीरा भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस स्थानकात जोडणी दिली जाणार आहे.
मेट्रो ९ मार्गिका
लांबी १३.६ किमीस्थानके १० खर्च ६६०७ कोटी रुपये.