Join us
Daily Top 2Weekly Top 5

करड्या आणि लाल रंगांनी बहरणार मेट्रोचे खांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 15:31 IST

Mumbai Metro : मेट्रोची कामे वेगाने सुरु असून, मेट्रोच्या बांधकामांच्या सौंदर्यांत भर...

 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रोची कामे वेगाने सुरु असून, मेट्रोच्या बांधकामांच्या सौंदर्यांत भर पडावी म्हणून प्राधिकरण सरसावले आहे. त्यानुसार, पश्चिम उपनगरात सुरु असलेल्या मेट्रो-७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) च्या खांबांना करडा रंग देण्यात येत असून, बीममधील ज्या पटटया आहेत; त्यास लाल रंग देण्यात येत आहे. उर्वरित मेट्रोच्या बांधकामांच्या खांबांनादेखील करड्या रंगाचाच हात मारण्यात येणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव आणि अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी नुकतेच मेट्रो-७ च्या प्रगतीपथावर असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी संबंधितांनी मेट्रोच्या सौंदर्यीकरणावरदेखील भर दिला. येथील मेट्रोच्या काही खांबांना करड्या रंगाचा हात मारण्यात आला असून, पायाखालच्या वर्तुळाकर भागास आणि बीममधील अंतर्गत भागात लाल रंगाचा हात मारण्यात आला आहे . या कामाची राजीव आणि सेठी यांनी पाहणी करत चारकोप डेपोच्या कामाचादेखील आढावा घेतला.मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या ट्रायल जानेवारी महिन्यात सुरु  होणार आहेत. विशेषत: या दोन्ही मार्गासाठी लागणारे मेट्रो रेल्वे कोच येत्या काही दिवसांत चारकोप डेपोत दाखल होणार असून, जानेवारी महिन्यातील मेट्रो रेल्वेच्या ट्रायलनंतर प्रत्यक्षात मे महिन्यात या दोन्ही मार्गांवरील मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार आहेत. मेट्रो सुरु करतानाच दोन मेट्रोमध्ये अर्धा तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल. सर्व योजना पुर्ण झाल्या आहेत. कोरोनामुळे काही अडचणी आल्या. कामगार कमी झाले. मात्र आम्ही अडचणींवर मात केली, असा दावा प्राधिकरणाने केला आहे.  

टॅग्स :एमएमआरडीएमेट्रोमुंबईरेल्वेरस्ते वाहतूक