Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 08:50 IST2025-11-18T08:48:36+5:302025-11-18T08:50:24+5:30
Dahisar-Bhayandar Metro: दहिसर ते भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू अपघाती मृत्यू झाला.

Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसर ते भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या कामावर अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी ‘एमएमआरडीए’ने कंत्राटदार कंपनी ‘एन. ए. कन्स्ट्रक्शन’ला ५० लाख रुपयांचा आणि सामान्य सल्लागाराला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मिरा रोडच्या साईबाबानगर येथे काम सुरू असताना सुपरवायझर फरहान अहमद (वय ४२) यांचा तोल जाऊन ते सुमारे ६० ते ७० फुटांवरून खाली कोसळले. त्यांना भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती.
दरम्यान, मेट्रो ९ मार्गिकेवर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्याप्रकरणी कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे. तसेच या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सिस्ट्रा या कंपनीलाही दंड केला आहे.
कुटुंबाला ५ लाखांची मदत
‘एमएमआरडीए’ने मृत सुपरवायझर फरहान अहमद यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून ५ लाख रुपये दिले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचे पैसेही दिले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एमएमआरडीएने या अपघाताची चौकशी करण्यासाठी मेट्रो ४ च्या कामाची देखरेख करणाऱ्या जनरल सल्लागार यांची नियुक्ती केली आहे.