Join us

Nisarga Cyclone: कोरोना, अम्फाननंतर आता नवे वादळी संकट; कोकणात हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 08:00 IST

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बुधवारी २४८७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 67,655 वर गेली आहे. राज्यासह संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीविरुद्ध लढत असताना पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' चक्रीवादळाने धडक दिली होती. अम्फान वादळात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर किनाऱ्यालगत असणारे अनेक घरं जमीनदोस्त झाली होती. मात्र अम्फान चक्रीवादळातून सावरत असताना आता पुन्हा एक संकट उभं राहिलं आहे.

अरबी समुद्रात हवामानाच्या स्थितीचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास ‘निसर्ग’ असे नामकरण केले जाईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे.

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून समुद्र त्यामुळे खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किना-याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे हवामान खात्याने म्हटले आहे. याचपार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील मुंबई विभागाकडून देण्यात आला आहे. 

टॅग्स :चक्रीवादळमहाराष्ट्रअम्फान चक्रीवादळकोरोना वायरस बातम्याभारतपाऊसनिसर्ग चक्रीवादळ