मानसिक आजार ही मधुमेहाइतकीच भीषण समस्या, जागरुकता महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:36 IST2025-12-01T12:33:40+5:302025-12-01T12:36:14+5:30
We the Women 2025 Summit: कार्यक्रमात महिला लष्करी अधिकारी, क्रिकेटपटू, लेखक, कलाकार, शिक्षक, मानसोपचारतज्ज्ञ, उद्योजक क्षेत्रातील दिग्गजांनी मते मांडली.

मानसिक आजार ही मधुमेहाइतकीच भीषण समस्या, जागरुकता महत्त्वाची
मुंबई : मानसिक आजार ही मधुमेहाइतकीच भीषण समस्या झाली आहे. ज्या पद्धतीने आपण मधुमेहाचा स्वीकार करून त्यावर उपचार करतो तितकीच सतर्कता राखत मानसिक आरोग्याबाबत उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांच्या कल्पनेतून साकारलेल्या 'वुई द वुमन' या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात महिला लष्करी अधिकारी, क्रिकेटपटू, लेखक, कलाकार, शिक्षक, मानसोपचारतज्ज्ञ, उद्योजक क्षेत्रातील दिग्गजांनी मते मांडली. बहुतांश चर्चासत्रांचा सूर मानसिक आरोग्याच्या समस्येकडे होता. कुमार मंगलम बिर्ला यांच्या कन्या अनन्या यांना 'चेन्ज मेकर' पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोविडनंतर अनेकांच्या मनावर आघात
एका सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार व लेखिका शोभा डे यांनी नातेसंबंधांवर भाष्य केले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि त्यातही विशेष म्हणजे कोविडनंतर आपल्या सगळ्यांच्याच मनावर काही ना काही आघात झाला आहे.
नात्यातील संवेदनशीलता जपणे गरजेचे आहे. नात्याचा नव्याने शोध घेत त्यात नवे रंग भरणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. फॅशन डिझायनर मसाबा रिचर्डस यांनीदेखील आपण नैराश्याचा सामना कसा केला आणि त्यातून कसे बाहेर आलो, यावर भाष्य केले. 'लोकमत' या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
मुला-मुलींत फरक नाही
चेंज मेकर पुरस्कार स्वीकारताना अनन्या बिर्ला म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी मला सांगितले की, मुलगा आणि मुलगी यात फरक नाही आणि त्याच विश्वासाने व्यवसायाची काही सुत्रे माझ्याकडे सोपवली. तसेच केवळ काम नाही तर त्याचसोबत संगीत ही आपली आवडदेखील आपण तितक्याच तळमळीने जपत असल्याचे त्या म्हणाल्या.
१ लाखामागे एक मानसोपचारतज्ज्ञ
मानसोपचार क्षेत्रात काम करणाऱ्या नेहा कृपाल यांनी मानसिक आरोग्याबद्दल धक्कादायक माहिती दिली. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये प्रत्येक १ लाख लोकसंख्येमागे केवळ १ मानसोपचारतज्ज्ञ असल्याचे त्या म्हणाल्या.
मानसिक आरोग्याबाबत जगात आपला देश तिसऱ्या क्रमांकावर असून, २०२७पर्यंत दर चार लोकांमागे एक व्यक्ती मानसिक आरोग्याचा सामना करेल, असे नेहा कृपाल यांनी सांगितले.