महामोर्चापूर्वी मनसेत मेगाभरती; हर्षवर्धन जाधव यांच्यासह अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 14:24 IST2020-02-08T14:24:04+5:302020-02-08T14:24:58+5:30
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेने रविवारी महामोर्चा आयोजित केला आहे. दरम्यान, या महामोर्चापूर्वी मनसेमध्ये मोठ्या प्रमाण इनकमिंगला सुरुवात झाली आहे.

महामोर्चापूर्वी मनसेत मेगाभरती; हर्षवर्धन जाधव यांच्यासह अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश
मुंबई - मुंबई आणि देशभरात घुसलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेने रविवारी महामोर्चा आयोजित केला आहे. दरम्यान, या महामोर्चापूर्वी मनसेमध्ये मोठ्या प्रमाण इनकमिंगला सुरुवात झाली आहे. आज कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मनसेत प्रवेश केला.
हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन हे आधी मनसेमध्ये होते. मात्र नंतर हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान, हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासह शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुहास दशरथे आणि नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेच प्रवेश केला.
दरम्यान, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. पक्षाने हिंदुत्वाचे वळण घेतल्यानंतरचा हा पहिलाच मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. सोशल मीडियातील नेहमीच्या प्रचारासोबतच यंदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि वॉर्डावॉर्डातून फ्लेक्स आणि बॅनरद्वारे नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रविवार, ९ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. दुपारी बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून, आझाद मैदान येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता होईल. या मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे. जास्तीतजास्त लोकांना मोर्चात आणण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.