Mega Blocks on the Mumbai's three railway lines today | मुंबईच्या तिन्ही रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक 
मुंबईच्या तिन्ही रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक 

मुंबई - रविवारी 28 एप्रिल रोजी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गावर रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते अंधेरी दरम्यान स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. 

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक असल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणा-या जलद मार्गावर लोकल गाड्या दिवा ते परळदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दरम्यान दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दु. ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या लोकल फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम मार्गावरील बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत ब्लॉक असल्याने सांताक्रूझ ते बोरिवलीदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर लोकलला थांबा देण्यात येणार नाही. लोअर परळ आणि माहिम स्थानकांवर १५ डब्यांच्या गाड्यांना दोनदा थांबा दिला जाणार आहे. धिम्या मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल या दरम्यान चर्चगेट दिशेकडील जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे. या लोकलला खार रोड स्थानकावर दोनदा थांबा दिला जाणार आहे. माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ व महालक्ष्मी स्थानकावर थांबा दिला जाणार नाही.


Web Title: Mega Blocks on the Mumbai's three railway lines today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.