मुंबई - शहरात विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात अनियमितता आणि गैरकारभार सुरू आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुंबईतील रस्त्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे येणे अपेक्षित होते, परंतु तासभराच्या गैरहजेरीनंतर बैठक संपण्याच्या काही मिनिटे ते उपस्थित झाले.
या बैठकीला आदित्य ठाकरे हजर होते. गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने मुंबईतील रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत होते. आजच्या या बैठकीला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदा समोरासमोर येणार होते. परंतु सभागृहातील कामात व्यस्त असल्याने एकनाथ शिंदे बैठकीला उशीरा पोहचले. या बैठकीला जेव्हा एकनाथ शिंदे आले तेव्हा सगळे उभे राहिले परंतु आदित्य ठाकरे त्यांच्या जागेवरून उठले नाहीत. संपूर्ण बैठकीत आदित्य ठाकरे कटाक्षाने पाहत होते. परंतु एकनाथ शिंदेंनी आदित्य यांच्या नजरेला नजर देणे टाळले.
विशेष म्हणजे या बैठकीतील एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या देहबोलीवर अनेक चर्चा रंगल्या. आधी बैठकीला अनुपस्थित असलेले शिंदे तासाभराने बैठकीला आले. जेव्हा शिंदे दालनात आले तेव्हा सर्व आमदार उठून उभे राहिले त्यावेळी आदित्य ठाकरे बसूनच राहिल्याचे पाहायला मिळालं. या बैठकीनंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलले त्यात त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी आम्ही अध्यक्षांना मागणी केली होती, मुंबईतील रस्त्यासंदर्भात सर्वच आमदारांना घेऊन बैठक लावावी. या बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातला आहे ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील परंतु ते बैठकीच्या शेवटी आले आणि थातूरमातूर उत्तरे दिली असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
दरम्यान, मुंबईतील रस्त्यासंदर्भातील बैठकीला शहरातील सर्व पक्षाचे आमदार उपस्थित होते. त्यात विरोधी पक्षाचे ठाकरे गटाचे, काँग्रेसचे आमदारही होते. मुंबईतील रस्त्यांच्या कामाबद्दल ठाकरे गट आणि भाजपा यांच्याकडून आक्षेप घेतल्याचं दिसून येते. ठाकरे गटाकडून थेट रस्ते कामात घोटाळा असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. तर शहरातील कामे संथगतीने सुरू असल्याचा आक्षेप भाजपा आमदारांचा आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्याकडून रस्ते कामांचा आढावा घेणारा रिपोर्ट सादर करण्यात आला. टप्पा १ मध्ये २३ टक्के तर टप्पा २ मध्ये ०.५ टक्के काम पूर्ण झाल्याचं शिंदेंनी सांगितले. २५ एप्रिलला पुन्हा रस्त्यांच्या कामाबाबत बैठक बोलावली जाईल.