माटुंगा, परळमध्ये मिळेल मुबलक पाणी; गळती रोखणार; जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी करणार खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:56 IST2025-10-07T09:56:53+5:302025-10-07T09:56:59+5:30
मागील काही काळात एफ दक्षिण विभागातून पालिकेकडे दूषित पाणी तसेच गळतीच्या तक्रारी वारंवार आल्या आहेत.

माटुंगा, परळमध्ये मिळेल मुबलक पाणी; गळती रोखणार; जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी करणार खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मुंबईतील विशेषत: परळ, नायगाव, माटुंगासारख्या परिसरातील पाण्याची गळती महापालिका राेखणार आहे. त्याकरिता जल अभियंता विभागाकडून एफ दक्षिण विभागातील जलवाहिन्यांच्या सक्षमीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. पालिका जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीवर ४ काेटींचा खर्च करणार आहे.
मागील काही काळात एफ दक्षिण विभागातून पालिकेकडे दूषित पाणी तसेच गळतीच्या तक्रारी वारंवार आल्या आहेत. त्यामुळे पुढील २ वर्षांसाठी या विभागातील जलवाहिन्या आणि जलपुरवठा व्यवस्थेची दुरुस्ती, देखभाल व पुनर्स्थापना करण्यात येणार आहे.
दक्षिण मुंबईतील अनेक विभागांत ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांचे जाळे आहे. एफ दक्षिण विभागातही जुन्या आणि झिजलेल्या जलवाहिन्यांमुळे वारंवार गळती होऊन पाणी दूषितीकरणाच्या प्रमाणात भर पडत आहे. या प्रकल्पांतर्गत या जलवाहिनीची दुरुस्ती किंवा पुनर्स्थापना करून गळतीवर नियंत्रण आणणे हा आहे, शिवाय नव्याने होणाऱ्या २ वर्षांच्या देखभाल कालावधीत कंत्राटदाराला तक्रारी आल्यापासून ४८ तासांच्या आत पाणीगळती अथवा दूषित जलपुरवठा दुरुस्त करण्याचे बंधन आहे.
प्रकल्पांतर्गत या भागांचा समावेश
प्रकल्पांतर्गत परळ, माटुंगा, नायगाव, डिलायल रोड, अंबा परिसर आणि दक्षिण मुंबईतील आसपासचे भाग या कामात समाविष्ट आहेत, शिवाय कामाच्या आवाक्यात पाणीगळती दुरुस्ती, नवीन सेवा जोडण्या देणे, जुन्या जोडण्या तोडणे, दूषित पाणीपुरवठा टाळण्यासाठी जुन्या पाइपलाइनचे बदल करणे, विविध व्यासाच्या (३०० मिमीपर्यंत) जलवाहिन्या बसविणे, नवीन वाल्व्ह, फायर हायड्रंट आणि बटरफ्लाय वाॅल्व्ह बसविणे, तसेच खोदकामानंतर रस्ते, डांबर व फूटपाथ पुनर्स्थापित करणे यांचा समावेश आहे.
वाहतूक पोलिसांशी समन्वय आवश्यक
प्रकल्पातील कामाच्या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत अडथळे येऊ नयेत, म्हणून कंत्राटदाराने वाहतूक पोलिस विभागाशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे.
कामासाठी वापरले जाणारे साहित्य आणि उपकरणे ठेवण्यासाठी ही स्वत: जागा शोधून आवश्यक परवानग्या घ्याव्यात, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे या परिसरातील पाणीगळती आणि दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण घटेल.