२५६ कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणातील सूत्रधार गजाआड; आतापर्यंत १५ जणांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 07:52 IST2025-10-25T07:51:41+5:302025-10-25T07:52:23+5:30
दुबईतून प्रत्यार्पणानंतर अटक; आतापर्यंत १५ जणांना बेड्या

२५६ कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणातील सूत्रधार गजाआड; आतापर्यंत १५ जणांना बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गुन्हे शाखेने २५६ कोटींच्या अमली पदार्थांच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला दुबईतून प्रत्यार्पण करून अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, शेख हा दुबईत राहून संपूर्ण भारतात अमली पदार्थ वितरणाचे जाळे चालवत होता. त्याच्या टोळीने महाराष्ट्र आणि गुजरातसह विविध राज्यांत मॅफेड्रोनचे उत्पादन आणि वितरणाचे विस्तृत नेटवर्क उभारले होते. आर्थिक व्यवहारांसाठी त्यांनी अंगडिया ऑपरेटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण केली होती.
१६ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ७ ने कुर्ला येथून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला २५ कोटी रुपयांच्या मॅफेड्रोनसह अटक केली होती.
तपासादरम्यान परवीनला अमली पदार्थ पुरवणारा साजिद मोहम्मद आसिफ शेख हाही पोलिसांच्या ताब्यात आला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे शेख या मुख्य सूत्रधाराचा शोध लागला. या कारवाईत पोलिसांनी १२६.१४ किलो मॅफेड्रोन, ३ कोटी ६२ लाख रुपयांची रोकड, तसेच इतर मालमत्ता जप्त केली आहे. मोहम्मद सलीम शेखविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर यूएई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २२ ऑक्टोबर रोजी त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.
३० तारखेपर्यंत पोलिस कोठडी
न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याआधीही दुबईतील आरोपी ताहेर सलीम होला आणि मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यांचे प्रत्यार्पण करण्यात आले होते.