Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:18 IST2026-01-15T17:16:49+5:302026-01-15T17:18:42+5:30
BMC Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक मोठी खळबळ उडाली आहे. उद्धवसेनेचे अनिल परब यांनी मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईबाबत अत्यंत गंभीर दावा केला आहे.

Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
आज मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान पार पडत आहे. मुंबईत आज मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापालिका निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढले आहेत.
अनिल परब म्हणाले की, "मी यापूर्वी शाई अशा प्रकारे गायब होताना कधीही पाहिली नाही. मतदानानंतर बोटावर जी खूण केली जात आहे, ती निवडणुकीची शाई नसून केवळ एक मार्कर आहे. हा मार्कर सहजपणे पुसला जाऊ शकतो. यामध्ये निश्चितच काहीतरी मोठी गडबड आहे."
Mumbai | After casting his vote for the BMC elections, Shiv Sena (UBT) leader Anil Parab says, "This is for the first time, I have never seen the ink vanishing this way. This is a marker... The ink of the election is different, and this marker is different, which can be wiped… pic.twitter.com/IITx0R6k1K
— ANI (@ANI) January 15, 2026
नेमका आरोप काय?
परब यांनी असा संशय व्यक्त केला आहे की, जर ही शाई पुसली जात असेल, तर त्याचा गैरवापर करून 'बोगस मतदान' केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. "निवडणुकीसाठी वापरली जाणारी शाई अनेक दिवस निघत नाही. मात्र, या निवडणुकीत वापरला जाणारा मार्कर वेगळाच आहे," असेही त्यांनी म्हटले.
विरोधकांचा सामूहिक आक्षेप
केवळ अनिल परबच नव्हे, तर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले. राज ठाकरे यांनी दावा केला की, सॅनिटायझर वापरून ही शाई सहज निघत आहे, ज्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा मतदान करणे शक्य होत आहे.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
या आरोपांवर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे की, २०११ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाटलीऐवजी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. तसेच, केवळ शाई पुसल्याने कोणीही पुन्हा मतदान करू शकत नाही, कारण मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराची अधिकृत नोंद ठेवली जाते.