Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:00 IST2025-10-18T13:58:46+5:302025-10-18T14:00:53+5:30
Mumbai Malad Fire: मुंबईतील मालाड परिसरात आज, शनिवारी दुपारी लाकडी भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
Malad Fire: मुंबईतील मालाड परिसरात आज, शनिवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी लाकडी भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आकाशात दूरवर धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत.
लाकडी सामानामुळे आग भडकली!
मालाड पूर्व भागातील पिंपरीपाडा परिसरातील पंजाब डेअरी जवळ हे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये लाकडी प्लाय आणि इतर लाकडी सामान मोठ्या प्रमाणात असल्याने, आग अत्यंत वेगाने पसरली आणि तिने रौद्ररूप धारण केले.
Massive breaks out in Mumbai’s Malad East area. Blaze erupted at wooden scrap near Punjab dairy in Sanjaynagar.#MumbaiFire#Mumbai#Maladpic.twitter.com/EeEIkDjrxO
— LMS ✏️ (@Lalmohmmad) October 18, 2025
आग विझवण्याचे प्रयत्न सुरू; अरुंद रस्त्यांमुळे अडथळा
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या भागातील अरुंद गल्ल्या आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे (Traffic Jams) अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी येत होती. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
ही घटना जवळपास एक किलोमीटर दूरवरून दिसत होती, कारण पेटलेल्या गोदामातून काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात पसरले होते. हे गोडाऊन झोपडपट्टीजवळ असल्याने, आग वस्तीमध्ये पसरेल या भीतीने नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही!
या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कूलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यावर आग लागण्याचे नेमके कारण काय होते, याचा तपास केला जाईल.
शुक्रवारीही अंधेरीत लागली होती आग
दरम्यान, या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी मुंबईतील अंधेरी पूर्व भागातही आगीची घटना घडली होती. मरोळ येथील केडीएन कंपाऊंडमधील अशोक टॉवरजवळील एका दुकानात ही आग लागली होती. ही आग लेव्हल-१ स्वरूपाची होती. या आगीत सीसीटीव्ही कॅमेरे, टायर्स, तीन दुचाकी आणि इतर अनेक वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते, ज्यामुळे दुकान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले होते.