Join us  

'जनतेनं भगवा फडकवला, पण शिवसेनेनं तो सोनिया गांधी, शरद पवारांच्या चरणी ठेवला'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 4:52 PM

राज्यातील अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळले.

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले, "जनतेने, महाराष्ट्राने राज्यात भगवा फडकवला, पण तोच भगवा शिवसेनेने सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या चरणी ठेवला."

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली.

मातोश्रीवरुन बाहेर न पडणाऱ्यांनी अनेकांच्या पायऱ्या झिजवल्या, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, शिवसेनेला नंबर गेम लक्षात आला आणि बार्गेनिंग पॉवर वाढल्याचे समजल्याने जे कधीच ठरले नव्हते, त्याबाबत शिवसेनेने दिली, तरीही भाजपाने सात्विक भूमिका घेतली. परंतु शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करु लागली, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केला.

जनादेशाचा सन्मान करण्यासाठी जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. जनतेने भाजपला जनादेश दिला, कारण आम्ही 70 टक्के जागा जिंकलो, तर शिवसेना केवळ 40 टक्के जागांवर विजयी झाली. शिवसेनेने बहुमत असल्याचे भासवून हसू करुन घेतले, त्यानंतर राष्ट्रवादीही बहुमत सिद्ध करण्यात अपयशी, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राष्ट्रपती राजवट लागल्यानंतरही तीन पक्ष मिळून सरकार तयार करणार असे सांगितले जात होते पण असे होत नव्हते. तीन पक्षांची विविध विचारधारा होती. भाजपाला दूर ठेवा एवढाच किमान समान कार्यक्रम होता. राज्यात किती वेळ राष्ट्रपती राजवट राहिल अशी परिस्थिती असताना अजित पवार यांनी सत्तास्थापनेसाठी सहकार्य करण्याचे ठरविले. अजित पवारांशी चर्चा करुन राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या पाठिंबा पत्राआधारे आम्ही बहुमताचा दावा केला. शपथविधी झाला असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :विनोद तावडेभाजपाशिवसेनामहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारदेवेंद्र फडणवीस