मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 04:32 IST2025-05-13T04:31:18+5:302025-05-13T04:32:00+5:30

पावसात वीज, झाड पडून दोन जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी घरांचीही पडझड 

marathwada uttar maharashtra hit by unseasonal rains crop damage farmers suffer huge losses | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, केळी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात वीज पडून एका तरुणाचा तर नाशिकमध्ये झाड अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. बीड शहरातील पोलिस पेट्रोलपंपाचे छत कोसळल्याने दोघे जखमी झाले.  

वीज पडल्याने भाटेपुरी (ता.जालना) येथील विठ्ठल गंगाधर कावळे (२४) या युवकाचा मृत्यू झाला. बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात भूम शहर व परिसरात काही ठिकाणी गारा पडल्या. उमरगा तालुक्यात येणेगूर येथे प्रवासी ऑटोवर वादळी वाऱ्यात वीजवाहिनी कोसळली. यात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कोरडगाव येथील आसना नदीला पूर आला. नाशिकमध्येही सलग दुसऱ्या दिवशी तासभर मुसळधार पाऊस झाला. झाड दुचाकीवर कोसळल्याने गौरव भास्कर रिपोटे (२१, रा. देवळाली गाव) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला.  सोलापूर शहरातही सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.  

पुढील दोन दिवस पावसाचे 

राज्यात पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव येथे मंगळवारी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे गारांसह पाऊस झाल्याने सोमवारच्या आठवडी बाजारात एकच धावपळ उडाली. या पावसामुळे वाहत असलेल्या पाण्यात रस्त्याने टरबूज वाहत असताना ते वाचविण्यासाठी लहान मुलाची धडपड सुरू होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 

जळगाव : रावेर तालुक्यातील पाडळे बुद्रुक, निरूळ, पाडळे, अहिरवाडी,  केर्‍हाळे, कर्जोद शिवारातील २२१ शेतकर्‍यांच्या १०५ हेक्टरमधील ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त झाल्या. 

हिंगोली : अवकाळी पावसामुळे पपईची झाडे उन्मळून पडली. 

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यात कोरडगाव, निपाणी जळगाव, कोळसांगवी, मुखेकरवाडी, भुतेटाकळी, करंजी परिसरातील शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. 

 

Web Title: marathwada uttar maharashtra hit by unseasonal rains crop damage farmers suffer huge losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.