मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:02 IST2026-01-01T17:01:34+5:302026-01-01T17:02:16+5:30
गेल्या २ दिवसांपासून कृपाशंकर सिंह यांचे उत्तर भारतीय महापौर बसेल हे विधान चर्चेत आले आहे

मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
मुंबई - महापौर बनवण्याची एक प्रक्रिया असते, कोणी बोलले म्हणून महापौर होत नाही. विरोधकांनी माझ्या विधानाचं राजकारण केले. मुंबईसह २९ महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल हा माझा अनुभव सांगतो. विकासाच्या कामावर या निवडणुका होतायेत. नगरपालिका, नगरपंचायतीच्या निकालानंतर विरोधकांना काम राहिले नाही. हिंदू महापौर मुंबईत बसेल. मराठी हेदेखील हिंदूच आहेत असं विधान भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी केले.
गेल्या २ दिवसांपासून कृपाशंकर सिंह यांचे उत्तर भारतीय महापौर बसेल हे विधान चर्चेत आले आहे. त्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी त्यावर पुन्हा स्पष्टीकरण दिले. एका मुलाखतीत कृपाशंकर सिंह म्हणाले की, मी जे बोललो होतो तो चर्चेचा भाग होता. ते गंभीरतेने घ्यायचे कारण नव्हते. उत्तर भारतीय महापौर बसेल अथवा इतर कुणी बसेल हा विषय माझा नाही. लोकशाहीत एक पद्धत असते, निवडून आलेले नगरसेवक असतील, पक्षाची संसदीय समिती असेल ते महापौर ठरवतील. महायुतीचा महापौर बसेल हे आमचे म्हणणं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी करतायेत, महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतायेत. मुंबई महाराष्ट्राचा विकास होत आहे. त्यावर लोक मतदान करतील. आम्ही भाजपाचे शिपाई म्हणून काम करतोय. माझी हात जोडून विनंती आहे. हिंदुत्वात कुठेही हिंदी भाषिक, मराठी भाषिक करू नका. मराठी संस्कृती आम्ही जपतो. मी मराठीबद्दल काय बोललो? महाराष्ट्रात मराठी भाषिक महापौर होणार नाही तर कुठे होणार? तुम्हाला विकासावर बोलायचे नाही, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावर बोलायचे नाहीत. हिंदी-मराठी वाद कशाला आणता असा सवाल करत कृपाशंकर सिंह यांनी विरोधकांवर टीका केली.
दरम्यान, मराठीने मला रोजीरोटी दिली. महाराष्ट्राने मला ओळख दिली. भाषेचा सन्मान आहे आणि राहणार आहे. मी कधीही मराठीविरोधात बोलू शकत नाही. मराठी संस्कृतीचा मला आदर आहे. त्यामुळे कृपया हा विषय पुढे वाढवू नका असंही कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं आहे.