रेल्वे सेवेतील मराठीच्या वापरासाठी पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 04:58 AM2020-02-27T04:58:37+5:302020-02-27T04:59:02+5:30

मुंबईकरांची मराठीची गाडी रेल्वे प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाच्यर रुळावरून घसरल्याचे चित्र होते. त्यामुळेच रेल्वे सेवेत मराठी भाषेचाच वापर व्हावा, यासाठी भाषाप्रेमी सरसावले आहेत.

marathi bhasha din Initiatives for the use of Marathi in the Railway Service | रेल्वे सेवेतील मराठीच्या वापरासाठी पुढाकार

रेल्वे सेवेतील मराठीच्या वापरासाठी पुढाकार

googlenewsNext

- कुलदीप घायवट 

मुंबई : रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. मात्र रेल्वे प्रशासनाने आपल्या कामकाजात मराठीकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. तिकिटावर मराठीत स्थानकाचे नाव लिहिण्याकडे केलेले दुर्लक्ष तसेच रेल्वेच्या आरक्षण अर्जावर इंग्रजीला दिलेले प्राधान्य अशा अनेक बाबींमुळे मुंबईकरांची मराठीची गाडी रेल्वे प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाच्यर रुळावरून घसरल्याचे चित्र होते. त्यामुळेच रेल्वे सेवेत मराठी भाषेचाच वापर व्हावा, यासाठी भाषाप्रेमी सरसावले आहेत. त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे स्थानकांची नावे मराठीत दिसू लागली आहेत. उद्घोषणा मराठी केल्या जात असून, रेल्वे तिकिटांवरही स्थानकांची नावे मराठीतून देण्यात आली आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने कामकाजात मराठीचा वापर करावा, यासाठी मराठीप्रेमींनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मराठी भाषेच्या वापरासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहारही केला. त्यानंतर, स्थानकांची नावे मराठीत दिसू लागली आहेत.

मध्य, पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रानुसार कारभार केला पाहिजे. मराठी भाषा वापरण्यासाठी कायदा तयार करणे गरजेचे आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक शिक्षेची तरतूद केली पाहिजे, तरच रेल्वेसह इतर सरकारी कार्यालयात मराठीचा वापर केला जाईल, अशी प्रतिक्रिया मी मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष प्रमोद मसुरकर यांनी दिली. पश्चिम रेल्वच्या आरक्षण अर्जावर गुजराती भाषेचा वापर केला जात होता. मात्र, मी मराठी एकीकरण समितीने गुजराती आरक्षण अर्ज असलेली बाजू काढायला लावली, तर मध्य रेल्वेच्या आरक्षण अर्जावर एक बाजू इंग्रजीत होती. ती मराठीत करायला लावली, असे मसूरकर यांनी सांगितले. स्थानकांची नावे मराठीतून असावीत, ती योग्य पद्धतीने लिहावीत, अशी मागणी असून ती पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे मी मराठी एकीकरण समितीने सांगितले.

येथे मराठी हवेच
आपत्कालीन स्थितीत गाडी थांबविण्यासाठी प्रवाशांना अलार्म सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सेवेची माहिती हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीत देण्यात आली असून मराठी भाषेला डावलण्यात आले आहे. त्यामुळे या सूचना फलकाच्यावर ‘येथे मराठी हवेच’ असा स्टिकर आम्ही लावला. त्यानंतर काही लोकलमध्ये मराठीतून अलार्म सेवेची माहिती प्रसिद्ध केल्याचे मसूरकर यांनी सांगितले.

Web Title: marathi bhasha din Initiatives for the use of Marathi in the Railway Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.