Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:04 IST2025-08-31T16:02:51+5:302025-08-31T16:04:29+5:30
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.

Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Maratha Reservation :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसापासून जरांगे यांनी आमरण उपोषण केले. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. राज्य सरकारनेही आता आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत. राजकीय नेत्यांनीही जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरुन विधान केले होते, या विधानावरुन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधताना पवार यांना प्रत्युत्तर दिले."जरांगे पाटील यांनी न्यायमूर्ती यांच्यासमोर मांडलेल्या प्रश्नांवर आज आम्ही बैठक घेतली. या मुद्द्यावर मार्ग निघावा म्हणून चर्चा करत आहे. शरद पवारांचं मला नेहमी आश्चर्य वाटतं, ते राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते. मंडल आयोग करताना त्यांच्या लक्षात का आलं नाही, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? , असा सवाल मंत्री विखे- पाटील यांनी केला.
'पवारांनी ओबीसीतून आरक्षण देता येईल हे सांगावं'
"पवार दहा वर्षे केंद्रात मंत्री होते, त्यावेळी केंद्रात आणि राज्यातही त्यांचचं सरकार होते. दहा वर्षात त्यांना घटनेत बदल करु शकतो हे समजलं नाही का? तेव्हाही मराठा आरक्षणाची मागणी होती. आपल्या स्वत:कडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती पूर्ण केली नाही.आपली राजकीय पोळी भाजण्याचे ते प्रयत्न करत आहेत. हे बरोबर नाही, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. शरद पवार आणि महाविकास आघाडीतील लोकांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येईल हे जाहीर करावं, असंही विखे -पाटील म्हणाले.
शरद पवार आज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत, यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, कुणी कोणाला भेटू शकत. भेट घेतल्यानंतर आरक्षण देता येईल का हे त्यांनी जाहीर करावं, असंही मंत्री विखे-पाटील म्हणाले.